पाथरी / प्रतिनिधी – सन २०२१-२२ मधील पिक विमा योजनेमध्ये पाथरी व मानवत तालुक्यातील वगळण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा अर्थसहाय्यचा लाभ द्यावा व सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी बुधवारी शेतकऱ्यांच्या वतीने कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांचेकडे करण्यात आली आहे.
बुधवारी पाथरीत आ.राजेश विटेकर व पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांंची भेट घेतली.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात केवळ पाथरी व मानवत तालुक्यातील सन २०२१-२२ मध्ये विमा योजनेतून शेतकऱ्यांना वगळले आहे ते विमा अर्थसहाय्य मंजुर करावे याशिवाय २०२२-२३ या वर्षीचा उर्वरित ७५ टक्के पिक विमा रक्कम मंजुर करावी आणि ती तातडीने वितरित करावी.याशिवाय ३१ आँगष्ट व १ सप्टेंबर रोजी पाथरी तालुक्यात सर्वच मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे, पशुधन मृत्यू,घरांची पडझड, वस्तीत पाणी शिरल्याने नुकसान अशा सर्व प्रकारची सरसगट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी निवेदनावर सही करणारे सभापती अनिलराव नखाते,माजी उपसभापती अरुण कोल्हे, कैलास शिंदे,बाबासाहेब शिंदे,शिवाजी कुटे, बिभीषण नखाते,दत्ता वर्हाडे,बाबासाहेब नखाते,लक्ष्मण ढोले, लहुराज घांडगे,नारायण फासाटे,रामचंद्र नखाते यांचेसह जवळपास दोनशे नागरिक उपस्थित होते.