परभणी – येथील शारदा महाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञान विभागाच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.बबन पवार म्हणाले, राष्ट्रसंत गाडगेबाबाचे कार्य अतुलनीय असून, त्यांनी केलेली समाज सेवा, समाजातील अज्ञान व अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रध्दा दूर करण्यासाठी कीर्तनातून समाज जागृत केला, असे गौरवउदगार काढले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. नितीन बावळे, उपप्राचार्य डॉ. वाघमारे श्यामसुंदर व आयक्यूएसी समन्वयक डॉ. संतोष नाकाडे व तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. सौ. कुलकर्णी स्वाती हे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी करण गायकवाड व कु. सीमा माने यांनी तयार केलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबांचे मानवी जीवनातील तत्वज्ञान या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. संतोष नाकाडे यांनी गाडगेबाबाचे जीवनाची माहिती सांगितली तर प्रमुख पाहुणे डॉ. नितीन बावळे यांनी गाडगेबाबांच्या विदर्भातील जन्मानंतर त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या कार्याचा आढावा घेत, त्यांनी अनाथालय, शिक्षण संस्था, दवाखाने स्थापन करून गोरगरीब जनतेच्या शिक्षणाची व समाज उपयोगी गरजांची पूर्तता व्हावी यासाठी कार्य केले, गावोगाव स्वच्छता अभियान राबवले, अत्यंत साध्या पोशाखात तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रयत शिक्षण संस्थेचे बंद केलेले अनुदान चालू करण्याबाबत आग्रह धरला, अशा गाडगेबाबांच्या जीवनातीलअनेक प्रसंगाचे वर्णन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शामसुंदर वाघमारे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. हनुमंत शेवाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कुलकर्णी स्वाती यांनी मांडले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.