सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर उसापेक्षाही आक्रमक आंदोलन उभारणार-रविकांत तुपकर यांची माहिती

परभणी,दि 09 (प्रतिनिधी)ः
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून अनेकांना अद्याप पीकविमा व नुकसानीचे अनुदान, पीककर्ज मिळालेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांप्रमाणे या भागातील कृषी उत्पादकांनी एकत्र येण्याची गरज असून त्यांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी भविष्यात सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर उसापेक्षाही आक्रमक आंदोलन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुधवारी (दि.9) परभणीत पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव शिंदे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन तुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख जाफर तरोडेकर, प्रसाद गरुड, बाळासाहेब घाटोळ, भगवानराव गरुड आदींची उपस्थिती होती. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली असून या भागातील शेतकर्‍यांचे चळवळीत मोठे योगदान राहिलेले आहे. या मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व आपण स्वत: काही दिवसांपूर्वी विदर्भासह मराठवाड्यात फिरुन सोयाबीन व उस परिषदा घेतल्याचे श्री तुपकर यांनी सांगितले. गेल्या वषीर्र् आपण नोव्हेंबर महिन्यात केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह व एल्गार आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने मागण्या मंजूर केल्याने कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या पदरात काहीअंशी जादा पैंसे पडले असल्याचे ते म्हणाले.
सोयाबीनला व कापसाचा दर स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, खाद्यतेलावरचा आयात कर वाढवावा, छोट्या व्यापार्‍यांवरील स्टॉक लिमिट उठविण्यात यावी आदी मागण्यांसाठी संघटना आग्रही आहे.
केंद्राच्या पीकविमा योजनेत अनेक जाचक अटी असून देशातील 13 राज्ये या योजनेतून बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रानेही याबाबत निर्णय घेवून राज्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी स्वतंत्र विमा कंपनी स्थापन करावी, यासाठीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला असून लवकरच त्यावर चर्चा होईल, असेही तुपकर यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जास्तीत जास्त उमेदवार ताकदीने निवडून आणू असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

Comments (0)
Add Comment