पावसाचा रेड अलर्ट..अनेक ठिकाणी मुसळधार सुरु….

 

: राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.  शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला. तर पुणे शहरात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे. याबाबत इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट देण्यात आलाय. तर संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्यात मान्सूनची स्थिती काय ?

दरम्यान आज (१० जून) रोजी मान्सूनचा पाऊस मराठवाड्याच्या काही भागांत, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भाग तसेच पुणे, नगर जिल्ह्याचा काही भागात पोहोचला असून लवकरच १५ जून पर्यंत मान्सूनचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ठाणे, नगर, बीड, निझामाबाद,सुकमा या जिल्ह्यांत मान्सून सक्रिय होणार

हवामान विभागाने आज सकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण दिशेकडील मान्सूनचा प्रवास ठाणे, नगर, बीड, निझामाबाद, सुकमा या भागातून होत असून येथपर्यंत मान्सून सक्रीय होताना दिसत आहे.

मुंबईत पावसाची संततधार

आज पहाटेपासून मुंबईत ठीकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, कुलाबा, वांद्र्यात पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळला. पुढील 3-4 तास मुंबईत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तर तशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान खात्याने आवाहन केलेय.

Comments (0)
Add Comment