सेलू / प्रतिनिधी – श्री.केशवराज बाबासाहेब संस्थान व स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी किर्तनकुल सेलू आयोजित रामदासी कीर्तन प्रशिक्षण शिबिर श्री.केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर सेलू येथे पार पडत आहे.दि.२३ मे गुरुवार रोजी समर्थभक्त गणेशबुवा रामदासी यांचे कीर्तन पार पडले .
सदा रामनामे वदा पूर्ण कामे ।
कदा बाधिजेनापदा नित्य नेमे ।
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक मधील हा श्लोक विवेचनासाठी त्यांनी घेतला.नेहमी न चुकता श्रीरामाचे नाव अगदी स्वेच्छेने घ्यावे यात रामावरची निष्ठा व्यक्त होते. नामस्मरणामुळे संकटांची बाधा होत नाही.संकटे येणारचं नाहीत असं इथं समर्थ म्हणत नाहीत.यायची ती संकटे ,आपदा ,विपदा येणारचं, त्या कुणाला चुकणार नाहीत.मग रामनाम जपाचा फायदा काय? तर त्या संकटांमधून भक्त तरून जाईल. तो हतबल होणार नाही ही ताकद नामस्मरणात आहे.भक्ताने अहंकार व आळस झटकून टाकावा.अहंकार आला की मन शुद्ध राहत नाही.अशुद्ध मन भक्तीला बाधक असते.सक्रीयतेची वृत्ती अंगीकारून रोज प्रभात समयी प्रभु श्रीरामांचे मनोमन चिंतन करत त्या परमात्म्याशी एकरूप व्हावे यातच जीवनाचे सार्थक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
कीर्तनाला शहरातील भाविकांची उपस्थिती होती.