धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अशा घोषणा मस्साजोग येथील ग्रामस्थांनी अजित पवार यांच्यासमोरच दिल्या. अजित पवार यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आरोपींना सोडणार नाही, असा शब्दच अजित पवारांनी देशमुख कुटुंबीयांना दिला.
अजित पवार जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मस्साजोगमध्ये पोहोचले तेव्हा ग्रामस्थ चांगलेच आक्रम झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी जोरदार घोषणाबाजी गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी पक्षपातीपणा केला आहे, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली.
अजित पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अधिवेशन संपल्यानंतर पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधला. या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. या सर्व प्रकरणावर आमचं बारकाईनं लक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच आश्वासित केल आहे की यावर कारवाई होणार करण्यात येईल. या प्रकरणात आम्ही दोन प्रकारे चौकशी करत आहोत. कोणाचाही दबाव नको म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही चौकशी करत आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
या प्रकरणात काही शंका-कुशंका राहू नयेत म्हणून आम्ही दुसरी न्यायालयीन चौकशी देखील करत आहोत. अशा पद्धतीने चौकशी होत असताना कुठेही त्यामध्ये त्रुटी राहणार नाहीत, या प्रकारची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. हे मी आपल्या सर्वांना आश्वासित करत आहे. सरकारच्या वतीने मी आपल्याला हे सांगत आहे, असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवारांना धनंजय मुंडे, वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले…
यानंतर अजित पवार मस्साजोगमधून परतत असताना गावकऱ्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भात त्यांना प्रश्न उपस्थित केला. तसेच अजित पवार यांना गावकऱ्यांनी थांबण्याचं आवाहन केले. यावेळी अजित पवार यांनी मी हेलिकॉप्टरने आलोय. अंधार पण पडत आहे. मला आधी लातूरला पोहोचायचं आहे, असं कारण सांगून ते तिथून निघून गेले.