मस्साजोग तालुक्यातील केज गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिकी कराडांना अटक करण्याची मागणी होत आहे. हत्येला 15 दिवस उलटले असून अद्याप आरोपीला अटक न झाल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. धनजंय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने मराठा समाजाने अजित पवारांना इशारा दिला आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांची हाकालपट्टी करा. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे. पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे. 28 डिसेंबरला निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.
उद्यापासून 28 डिसेंबरच्या मोर्चाची तयारी करण्यात येणार आहे. मराठा समाजच्यावतीने संतोष देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मस्साजोग गावाला आणि कुटुंबला पोलीस संरक्षण द्यावे. बीड जिल्ह्यात समतोल बिघडलाय . वाल्मिकी कराड याची ईडीच्या माध्यमातून चौकशी करून नार्को टेस्ट करण्यात यावी. जोपर्यंत धनंजय मुंडे यांची हकालपट्टी होत नाही अजित पवार यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाला निदर्शन करणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे
अंकुश कदम यांनी सांगितले की, मराठा क्रांती मोर्च्याची आज राज्यस्तरीय बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चा ज्यांनी सुरु केला होता ते सगळे आज उपस्थित आहेत. बैठकीत विविध ठराव मांडण्यात आले. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, या घटनेत ज्या पोलिसांचा सहभाग असेल त्यांना सहआरोपी करावे, असे ठराव करण्यात आले.
बीड जिल्ह्यात समतोल बिघडला आहे. त्या ठिकाणी एकाच जातीचे 70% पेक्षा जास्त अधिकारी आहेत. त्या ठिकाणी सर्व समाजातील नागरिकांना न्याय दिला पाहिजे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड हा या घटनेचे खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावे, अशी मागणी करण्यात आली.
वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासा
बीड जिल्ह्याच नाव खराब होतंय मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री पद हे मुख्यमंत्री यांनी स्वतः घ्यावं. राज्याच्या मुख्यमंत्री यांना पुरेसा पुरावा दिलंय. तरी मूळ आरोपी पकडला गेला नाहीय. छोट्या मोठ्या कारणावरून हत्या होते. पण ज्या कारणावरून हत्या करण्यात आलीय ते बीडमध्ये दहशत पसरवण्याचे काम करण्यात येतय. या घटनेचा निषेध म्हणून 28 तारखेला बीडला उपस्थित राहावं. महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने प्रकरण घेतलं नाही. वाल्मिकी कराडवर गुन्हा दाखल करावा. मोर्चानंतर पुन्हा एक राज्यस्तरीय बैठक होईल मग आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चाने सांगितले आहे.