पाथरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात मासिक पाळी समुपदेशन कार्यशाळेस प्रतिसाद

पाथरी,दि 09 ःपरभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थे तर्फे बुधवारी (दि.नऊ) पाथरी येथील  कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय  येथे 120 किशोरवयीन मुलीसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी 120 किशोरवयीन मुली व शिक्षकांची उपस्थिती होती. या प्रसंगी मुख्याध्यापिका प्रा पंडित, श्रीमती बोराडे, श्रीमती अरद्वाड , श्रीमती त्रीमले, श्रीमती रंगे , श्रीमती कांबळे  यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित  किशोरवयीन मुलींना स्त्रियांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस तसेच शाश्वत पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. या समुपदेशन सत्रात 120 विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थे तर्फे समुपदेशन करून मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे वाटप केले. शेवटी तितक्याच मुलींची 20 प्रश्नांची स्वयंअध्ययन चाचणी घेण्यात आली.

तसेच ‘मेन्स्ट्रुपेडिया’ या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले. येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थे तर्फे पॅड ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.
कोणतेही शासकीय मदत किंवा मानधन न घेता समुपदेशन करणारी  टीम: एचएआरसी संस्थेतील टीम सदस्य डॉ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, कु क्षितिजा तापडिया, प्रा अंजली जोशी, प्रा विशाका हेलसकर या मासिक पाळी समुपदेशन उपक्रमात स्वतःच्या व्यस्त नियोजन सांभाळून शासनाकडून किंवा संबंधित संस्थेकडून कोणतेही मानधन किंवा प्रवास खर्च न घेता काम करत आहे. एचएआरसी संस्था  सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करून लोकसहभागातून मागील 2019 पासून संपूर्ण जिल्ह्यात मासिक पाळी समुपदेशन चे कार्य करत आहे.
पार्श्वभूमी:  एचएआरसी संस्थे तर्फे मागील 2019 पासून आजवर संपूर्ण परभणी, हिंगोली, वाशीम व बीड  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 206 शाळेतील 16935 किशोरवयीन मुलींचे मासिक पाळी विषयी समुपदेशन करून 9565 गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
मुलींनी परखडपणे व्यक्त केल्या भावना:  अनेक विद्यार्थिनींनी स्टेजवर येऊन मनमोकळेपणे आपल्या मनातील प्रश्न, शंका  ना केवळ व्यक्त केल्या तर मासिक पाळी विषयीच्या विटाळ, चुकीच्या रूढी, गैरसमज विषयी परखडपणे भाष्य केले व विज्ञानवादी विचार व्यक्त केले। एचएआरसी टीमने त्यांच्या प्रश्नांचे शास्त्रोक्त उत्तराने समाधान केले.
प्रास्ताविक प्रा पद्मा भालेराव यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, क्षितिजा तापडिया यांनी प्रयत्न केले.

Comments (0)
Add Comment