परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची आकडेवारी समाधानकारक नाही. जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या 15,35,205 एवढी आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7,61,889 एवढी असून 50% नागरिकांनी लस घेतली आहे. तसेच दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 3,22,793 ज्याची टक्केवारी 21% एवढी आहे. राज्यात व जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्या धोका लक्षात घेता सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच पुढील काळात कोरोना संसर्ग प्रसार टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने परभणी जिल्ह्यात 11 ऑक्टोबर पासून सुधारित प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे सूधारीत आदेश –
1) सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक / व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मालकाव्यवस्थापक तसेच कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण असणे बंधनकार राहील. तसेच कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण माहिती प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणी साठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी. तसेच येणा-या ग्राहकांची कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले आसावे किंवा 48 तास अगोदर चाचणी केलेली असावी या सर्व बाबी तपासण्याची जबाबदारी मालकाव्यवस्थापनाचे राहील. नियमांचे पालन न करणा-या आस्थापना यांना रु. 5000 दंड लावण्यात येईल.
2) सर्व राशन दुकानदार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे बंधनकार आहे. तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर, मास्कचा वापर, सोशल डिस्टेसिंग, सॅनिटायझेशन याची
व्यवस्था करण्यात यावी. तसेच येणा-या ग्राहकांची कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले असल्याची पडताळणी करावी किंवा 48 तास अगोदर RTPCR चाचणी अहवाल निगेटीव्ह असल्याची पडताळणी करावी.
3) परभणी जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा (डोस) पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. कार्यालयात येणा-या नागरीकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा 48 तास अगोदर RTPCR चाचणी निगेटीव्ह असल्याचा अहवाल पडताळणी करुनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, तसेच ज्या अधिकारी/कर्मचारी यांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही, अशा अधिकारी/कर्मचारी यांचे तात्काळ लसिकरण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना प्रमुखाची राहील.
4) जिल्हयातील सर्व शासकीय खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांस भेटण्यासाठी येणा-या नातेवाईक यांची कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले असल्याची खात्री संबंधित डॉक्टरांनीकरावी, लसीकरण केले नसल्यास सदर रुग्णाची RTPCR चाचणी अहवाल निगेटीव्ह असल्याची पडताळणी करावी.
5) आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, खुल्या प्रांगणातील | लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे, खेळाची मैदाने व इतरही सार्वजनिक/ गर्दीच्या ठिकाणी नागरीकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टेसिंग, सॅनिटायझेशन या बाबतच्या नियमांचे ( Covid Appropriate Behavior) पालन करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरीकांनी गर्दी करु नये, लसीकरण करुन घ्यावे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणी साठी मागणी केल्यास त्यांना लसीकरण केल्याचे प्रमणापत्र उपलब्ध करुन द्यावे. किंवा 48 तास अगोदर RTPCR चाचणी निगेटीव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगावा. तसेच शासनाने व या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील, तसेच नियमांचे पालन न करणा-या नागरीकांना रु. 500 दंड लावण्यात येईल. (या करीता ग्राम स्तरावर ग्रामसेवक, नगर परिषदांच्या ठिकाणी मुख्याधीकारी व महानगरपालीका क्षेत्रात आयुक्त, मनपा यांनी पथके गठीत करावीत तसेच पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेने पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास पोलीस बंदोबस्त पूरविण्यात यावा)