श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा जनजागृती रॅली संपन्न

 

परभणी – मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, परभणी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ते सुरक्षा २०२५’ ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा १३ जानेवारी २०२५ रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेची परीक्षा अन्य ऑनलाइन परीक्षा प्रमाणे प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात आली, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. या स्पर्धेत श्री शिवाजी अभियांत्रिकी कॉलेज, श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, आणि अपूर्वा पॉलिटेक्निक सेलु यांसारख्या महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. १५ जानेवारी २०२५ रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी रस्ते सुरक्षेचे महत्त्व विशद केले. विजेत्यांना हेल्मेट व सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. अश्विनी स्वामी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. आशीष पाराशर, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. संतोष डुकरे, श्री. अतुल भगवत, श्री. हनुमान सुळे, श्री. अविनाश चोंडे, श्री. मनमथ कुडाले, श्री. शुभम अकुलवार उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून झाली. या कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी आयोजित रॅली, जी श्री शिवाजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे काढण्यात आली. रॅलीदरम्यान रस्ते सुरक्षेचे नियम पाळण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सांगता श्री. सुळे सर (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली रस्ते सुरक्षा शपथ घेत पूर्ण झाली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरविंद लोहट यांनी केले, तर समन्वयक म्हणून प्रा. राजू कुलकर्णी, प्रा. संभाजी सरपाते, प्रा. बी. आर. शिंदे (विभाग प्रमुख) यांनी जबाबदारी पार पाडली. हा उपक्रम सर्व उपस्थितांना रस्ते सुरक्षेबाबत जागरूक करणारा ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वीरीत्या झाल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाशदादा सोळंके, सचिव श्री. सतीश चव्हाण, व सहसचिव श्री. अनिलभाऊ नखाते व संस्थेच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.

Comments (0)
Add Comment