शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी रस्ते खोदले,इंटरनेट बंद,सरकार अलर्ट

शेतकरी संघटनांकडून १३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत जमण्यासाठी देण्यात आलेल्या हाकेच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रोखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. हरियाणा सरकारकडून अंबाला-पटियाला सीमा बंद करण्यात आली आहे. तसेच अंबाला, कुरुक्षेत्र, कठियाल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. हे सात जिल्हे शेतकरी आंदोलनाचे प्रमुख केंद्र म्हणून मानले जातात. त्यामुळे सरकारने या भागातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

शेतकऱ्यांना हरियाणात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी पंजाबवरुन दिल्लीला जाण्यासाठीचा वेगवाना मार्ग म्हणून ओळखला जाणारा जीटी रोडही बंद केला आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.

यापूर्वी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले होते. शेतकऱ्यांची ट्रॅक्टरसह महामार्गावर ठिय्या देत दिल्लीची सीमा रोखून धरली होती. या आंदोलनामुळे केंद्र सरकारची प्रचंड नाचक्की झाली होती. त्यामुळे या आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हरियाणा सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहे. गेल्यावेळी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा सरकारने केलेला बळाचा वापर टीकेचा विषय ठरला होता. तरीही यावेळीही हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. घग्गर परिसरात पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्ता खणला आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स हा भाग ओलांडू शकणार नाहीत. तर पंजाबकडून येणाऱ्या दाबवाली आणि शंभू रोडची सीमा बंद करण्यात आली आहे.

याशिवाय घग्गर परिसरात हरियाणा पोलिसांनी रस्त्यावर काँक्रिट ओतून  अडथळे तयार केले आहेत. या सगळ्यामुळे दिल्लीकडे निघालेल्या सामान्य प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. अनेक प्रवाशांना याठिकाणी उतरुन सामान घेऊन अंबालाच्या दिशेने पायपीट करावी लागत आहे.

Comments (0)
Add Comment