सेलू ( नारायण पाटील)
शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांना सेलू येथे शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वर्गीय शरद जोशी यांच्या प्रतिमेस शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते श्री संपतराव अवचार यांनी पुष्पहार अर्पण केला. स्वर्गीय शरद जोशी यांच्या काही निवडक विचार सूत्रांच्या पार्श्वभूमीवर या निमित्ताने एक चर्चासत्र आयोजित केले होते.
— ‘शेतकऱ्यांना इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा हक्क आहे.या देशात भारत आणि इंडिया असे दोन देश आहेत ( ज्याचे पोट शेतीवर तो भारत )जो माणूस निदान सहा महिने शेतीवर जगून दाखवेल तोच शेती अर्थशास्त्र समजू शकतो.नेहरू व्यवस्थेतून शेतकऱ्यांच्या पद्धतशीर शोषणाला सुरुवात झाली.शेतीची लूट चालूच आहे, फक्त लुटणारे बदलले.शेती ही जीवनशैली/संस्कृती नसून एक व्यवसाय आहे. भांडवल, श्रम, तंत्रज्ञान, बाजारभाव ही सारी कोणत्याही उद्योगाची मूलतत्त्वे आहेत (शेतीलाही हेच लागू आहे)शेतकऱ्यांना हवे बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य. सगळेच प्रचलित पक्ष समाजवादी आहेत. सरकारची अडवणुकीची शक्ती वाढवणे आणि त्यातून आपला वाटा मिळवणे, हाच त्यांचा हेतू असतो.जातीयता हा प्रश्न आहे, आरक्षण हे त्यावरचे उत्तर नाही.आरक्षण हा एका पेंढीवर शंभर गाई हंबरत ठेवण्याचा कार्यक्रम.’– या शरद जोशी यांनी वेळोवेळी मांडलेल्या भूमिकांच्या आधारावर यानिमित्ताने झालेल्या चर्चेत विश्वनाथ घुमरे, संपत कटारे,भगवान पवार,खंडेराव घुमरे, गंगाधर गजमल आदींनी भाग घेतला. चर्चासत्राचा समारोप जेष्ठ कार्यकर्ते आणि शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष श्री गोविंद जोशी यांनी केला. याप्रसंगी शिवाजी सोळंके, त्र्यंबक घुमरे, सुदामराव मगर, प्रदीप सोनेकर, मदनराव भोरकडे, बंडू बरसाले आदी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.