समाजातील लांडग्यांच्या नजरेपासून मुलींना वाचवा; सावधान करा

स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचे आवाहन, सेलूमध्ये श्रीराम कथेला श्रोत्यांची मोठी उपस्थिती

 

 

सेलू / नारायण पाटील – जीवन मूल्यांचे चिंतन आपल्या घरात उठताबसता झालं पाहिजे. मुलींना, तुझं फ्रेंड सर्कल काय आहे ? तुला कुठल्या मैत्रिणी आवडतात ? आणखी तुला कोण भेटतो ? असे प्रश्न आपण आपल्या मुलींना सहज विचारले पाहिजेत. कारण या समाजामध्ये अनेक लांडगे तुमच्या मुलीला पळवण्याकरता त्यांच्यावरती नजर ठेवून फिरत असतात. या लांडग्यापासून मुलींना वाचविण्याकरता पहिल्यांदा मुलींना सावधान करा, असे आवाहन राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी केले.

 

सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर हनुमानगढ परिसरात जयप्रकाश विजयकुमार बिहाणी कुटुंबियांतर्फे सुरू असलेल्या श्रीराम कथेमध्ये शुक्रवारी (दि.१८) रोजी राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज बोलत होते. शुक्रवारी रामकथेसाठी जगन्नाथधामचा देखणा मंच उभारण्यात आला होता. त्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले.

 

लेक आणि सुनेला समान न्याय द्या

स्वामीजी म्हणाले, आपलं घर टिकवून ठेवायचे असेल, तर आपली मुलगी आणि आपली लेक यांच्यामध्ये अंतर करू नका. दोघींना सारखा न्याय आणि समानता द्या. भेदभाव नको, असे सांगून मुलींची लग्न लवकरात लवकर करा. समाजातील अनेक समस्यांचं मुख्य कारण उशिरा होणारी लग्न हे आहे. मग शिक्षणाचं काय असा प्रश्न विचारला जातो. तर लग्नानंतर शिकवा. सून म्हणून लहान मुलगी घरात आणा आणि तिला लेक मानून आपल्या मुलीप्रमाणे शिकवा. शिक्षण थांबू नका. याद्वारे समाजातील अनेक समस्या नष्ट होऊन जातील.

 

मुलींना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षणाचे धडे द्या

स्वामीजी म्हणाले, की मुलींना वळण लावलं पाहिजे. आपण आपल्या मुलींना किती धर्मशिक्षण दिलं ? असा प्रश्न उपस्थित करून , धर्मशिक्षण न दिल्यामुळे किती मुली लव्ह जिहादला बळी पडतात ? याचे केरळा स्टोरीमध्ये विवरण आहे. त्यासाठी मुलींना गीतेचा अध्याय आलाच पाहिजे. पसायदान पाठ असले पाहिजे. आपल्या रीतीभाती कळल्या पाहिजेत. कपाळी कुंकू असले पाहिजे. शालीन, सभ्य कपडे घालण्याची पद्धत पाहिजे. आणि आत्ताचा काळात स्वसंरक्षणासाठी ज्युडो कराटे आणि लाठीकाठीचे शिक्षण दिलं पाहिजे. ज्याद्वारे एखाद्या गुंडाचा हात तिला मुरगळता आला पाहिजे.

 

पूर्वजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण प्रेरणादायी

स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज म्हणाले, की पूर्वजांचा इतिहास जाणून घेतल्याने मनाची जडणघडण होते. अंगात सामर्थ्य संचारते. आपल्या घरण्याविषयी अभिमान वाटू लागतो. त्यामुळे पूर्वजांच्या गौरवशाली इतिहासाचे चिरंतन स्मरण ठेवा कारण ते प्रेरणादायी असते. आयुष्य नश्वर आहे. त्यामुळे योग्य ध्येय निश्चित केले पाहिजे. ज्यांची मन घडतात त्यांच्याकडून महान कार्य सिद्धीस जातात. स्वतःतील आत्मविश्वास जागवा. स्वतः चूक करू नका पण, ज्यांच्याकडून चूक घडली त्यांच्याविषयी अंतःकरणात करूणा असू द्या. या वेळी विविध मान्यवरांसह ग्रामीण भागात संत तुकाराम गुरूकुलच्या माध्यमातून निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल रामकिशन आबा सोळंके व सौ.सोळंके (लिखित पिंपरी ता.परतूर) यांचा स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा.संजय पिंपळगावकर, अशोक लिंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. कथेला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

Comments (0)
Add Comment