श्री शिवाजी महाविद्यालयातील महारोजगार मेळाव्यातून ३१९ जणांची निवड

परभणी,दि 03 ः
येथील श्री शिवाजी महाविद्यालय, श्री शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालय, श्री शिवाजी पॉलिटेक्निक महाविद्यालय तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील ३१९ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांसाठी निवड झाली आहे.
सदरील मेळावा महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार (ता.०१) रोजी संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आनंद पाथरीकर उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाळासाहेब जामकर, दत्तात्रय अंभोरे, रमेश शेरे, आयटीआयचे प्राचार्य व्ही.के. आडे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, प्राचार्य शाहिद ठेकिया, प्राचार्य बी. यु. तरवटे, समन्वयक प्रा. प्रशांत विभूते, प्रा.प्रदीप रणखांब यांची उपस्थिती होती.
यावेळी देशभरातील २४ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यासाठी ९५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी ३१९ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. याप्रसंगी उदघाटनपर भाषणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण पुरेसे नाही, तुमच्यामध्ये आवश्यक कौशल्ये असणेही गरजेचे आहे. अनेक कंपन्या तुमच्यासारख्या योग्य उमेदवाराची वाट पाहत आहेत. त्यामुळे आत्मविश्वासाने कठीण परिश्रम घेऊन संधीचे सोने करा. स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची किंमत कशातही मोजता येत नाही असेही ते यावेळी म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आनंद पाथरीकर म्हणाले आजच्या तरुणांनी केवळ पदवी, डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र प्राप्त करून थांबू नये, तर आपल्या कौशल्यांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. कौशल्ये विकसित केल्याशिवाय चांगल्या नोकरीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. त्यामुळे कौशल्ये आत्मसात करून मोठे व्हा असे आवाहन केले. यावेळी स्टार्टअप, उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले होते. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अशा योजनांची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शाहिद ठेकिया यांनी, सूत्रसंचालन काजल थावरे तर आभार अरविंद लोहट यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment