बालकुमार साहित्य संमेलना अध्यक्षपदी कवी प्रा.इंद्रजीत भालेराव यांची निवड

परभणी,दि 30 ः
‘अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था’ आणि ‘कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्था’, यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम कवी इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आलेली आहे.
कवी इंद्रजीत भालेराव यांचे मुलांसाठी ‘गावाकडं’, ‘रानावनात’, ‘गाणी गोजिरवाणी’, ‘गाई घरा आल्या’ हे बाल साहित्य वाचनीय ठरलेले आहे. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात ९ फेब्रुवारी २०२३ पासून तीन दिवसांचे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रोहित पवार हे असून, सुनंदा पवार या संमेलनाच्या निमंत्रक आहेत.
इंद्रजीत भालेराव यांच्या ‘शिक बाबा शिक लढायला शिक’, ‘माझा बाप शेतकरी’, ‘एकुलती एक लाडाची लेक’ यासारख्या अनेक कविता मुलांच्या पसंतीला उतरलेल्या आहेत. मुलांपर्यंत किस्से आणि सुबोध गोष्टीतून कविता पोहोचवण्याचा कवींचा हातखंडा आहे. मुलांच्या अभ्यासक्रमालाही ‘बाप ही कविता’ सतत पंधरा वर्षे असल्यामुळे विद्यार्थी प्रिय कवी म्हणून इंद्रजीत भालेराव सुप्रसिद्ध आहेत. तसेच ‘प्रतिभा संगम’ कुमारांच्या साहित्य संमेलनातून ते पूर्वीपासूनच परिचयाचे आहेत. एकूणच बालसाहित्याच्या अंगाने त्यांची झालेली निवड सार्थ ठरलेली आहे. वेगवेगळे संदर्भ आणि साहित्य यांच्या अनुबंधातून त्यांच्या भाषणाची मेजवानी यानिमित्ताने ऐकायला मिळणार आहे.
या संमेलनाची माहिती आयोजक राजन लाखे व धनंजय ठाकरे यांनी दिली.

Comments (0)
Add Comment