सेलू, नारायण पाटील – परिवहन महामंडळाच्या ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” या ब्रीद वाक्याचा अधिकाऱ्यांना पूर्ण पणे विसर पडला असून तालुक्याच्या व मोठी बाजारपेठ असलेले सेलू बसस्थानक म्हणजे प्रवाश्यांच्या गैरसोयीचे माहेरघर बनत आहे .प्रवाशासाठी तयार केलेली आसन व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असून प्रवाशांना बसण्यासाठी पायरीचाच आधार घ्यावा लागत आहे .
सेलू हे तालुक्याचे ठिकाण असून येथे उपविभागीय अधिकारी व न्यायालयाच्या कामानिमित्त ग्रामीण भागातून जवळपास २० ते २५ खेडेगावातून प्रवाशी दररोज ये जा करतात .
तसेच सेलू तालुक्यातून जालना ,नांदेड ,बीड ,पुणे ,लातूर येथे देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत .त्यामुळे दररोजच बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते शाळेच्या वेळेत तर बस स्थानकाला अक्षरशः जत्रेचेच स्वरूप येते .
परिवहन मंडळाने बांधा व वापरा तत्वावर येथे भव्य बसस्थानक उभारले आहे .परंतु इमारत जरी भव्य असली तरी प्रवाशांची येथे मोठ्या प्रमाणावर गैरसोय आहे .पूर्वी येथे प्रवाशांना बसण्यासाठी १०० च्या जवळपास खुर्च्या होत्या परंतु आता याची अत्यंत दुरावस्था झाली असुन केवळ दहा ते बारा च खुर्च्या चांगल्या स्थितीत असून बाकी सर्व तुटल्या आहेत .त्यामुळे वयोवृद्ध व महिला तसेच अपंग प्रवाशांची बसण्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे .तसेच बसेस ची संख्या कमी झाली हे कारण पुढे करून तालुक्यातील बऱ्याच फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत .आहे त्या बसेस ची देखील दुरावस्था असून त्या मार्गावर कधी बंद पडत्याल त्याचा नेम नाही .लांब पल्याच्या गाड्या देखील बंद करण्यात आल्या आहेत .सेलू बीड ,रात्रीची सेलू पुणे ,सेलू नांदेड ,सेलू औरंगाबाद या बस सेवे सोबतच सेलू मंठा ,सेलू जिंतूर ,सेलू वालुर आदी गाड्याच्या फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या आहेत .
यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना द
देखील याबाबत काहींच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे .एके काळी ग्रामीण भागासाठी प्रवासाचा मुख्य स्रोत असलेली लालपरी आज मात्र शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे .
तरी तालुक्यातील प्रवाशांच्या या गैरसोईकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून उपाय योजना करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे .