सेलू / प्रतिनिधी – येथील ब्राम्हण गल्ली मधील दत्त मंदिर मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील दत्तजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .दि ८ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी “श्री” मूर्तीस अभिषेक तसेच ८ ते ११ या वेळेत गुरुचरित्र पारायण तसेच महिला मंडळाचे भजन कार्यक्रम होणार आहे .या मध्ये अनिल कुलकर्णी ,राजाभाऊ चारठाणकर व बाबुराव कुंडीकर हे दत्तभक्त पारायणास बसणार आहेत .तसेच १२ वाजता दत्त पंचपदी करून गल्लीतील भाविक भक्तांच्या घरी दत्त भिक्षाफेरी काढण्यात येणार असून आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
१४ डिसेंबर रोजी दत्तजयंतीचे औचित्य साधून सकाळी श्री च्या मूर्तीस लघुरुद्र अभिषेक होणार आहे . तसेच दुपारी ४ ते ६ यावेळेत बाल कीर्तनकार प्रद्युम्न प्रशांतराव सावरगावकर यांचे दत्त जन्माचे कीर्तन व दत्त मंदिराचे पुजारी मनोहरराव नर्सिकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणी मधून गुरुचरित्र पारायणातील ४ थ्या दत्तजन्म अध्यायाचे वाचन करून मोठ्या उत्साहात दत्त जन्म साजरा केला जाणार आहे .
दि १५ रोजी सकाळी “श्री” च्या मूर्तीस लघुरुद्र व दुपारी १२ वाजता महाआरती होणार आहे .व त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास तन ,मन व धनाने सहभागी होऊन दर्शन ,श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जन्मोत्सवाचे आयोजक तथा गुरुवार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .