सेलूत राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

स्वागताध्यक्ष पदी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे

 

सेलू ( नारायण पाटील) – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सेलूत आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा तसेच आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाची जय्यद तयारी सुरू असून सेलू शहरात राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी शहर सज्ज असल्याची माहिती या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद यांनी दिली आहे.

 

मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी येथील साई नाट्यमंदिरात राज्यातील २५६ तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा तसेच राज्यात आदर्श काम करणाऱ्या तालुका व जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची निवड झाली असून त्यांनी या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. साई नाट्य मंदिर येथे सहाशे पत्रकार यांची बैठक व्यवस्था असून पत्रकारांची निवास व्यवस्था बालाजी मंदिर सेलू येथे करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या तयारीवर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे लक्ष असून याबाबत ते रोज आढावा घेत आहेत. सभागृह आणि निवासव्यवस्था यांचे पूर्णपणे नियोजन झाले आहे. कार्यक्रमासाठी लागणाऱ्या इतर बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे ,जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके ,लक्ष्मण मानोलीकर,राजू हट्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू शहरातील सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास, कांचन कोरडे, मोहसिन अहमद, सतीश आकात, निरज लोया,निसार पठाण हे दररोज तयारीचा आढावा घेत आहेत.

 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे हे देखील तयारीबाबत दररोज सेलू पत्रकार संघाच्या संपर्कात आहेत. सेलू शहर हे एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर असल्याने या भागातील नागरिक तसेच सर्व राजकीय प्रतिनिधी राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी इच्छुक असल्याचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी यावेळी बोलून दाखवले.

Comments (0)
Add Comment