मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बेस्ट बसने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 48 जण जखमी झाल्याची माहिती होती. काल अपघातानंतर तिघांचा तात्काळ मृत्यू झाला होता. तर उर्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर उपचार सुरु असलेल्या दोघांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहेत. दरम्यान, ज्या बेस्ट बसमुळे हा अपघात झाला त्या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय मोरे याच्याकडून बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ती गर्दी शिरली असे सांगितले जात आहे. मात्र, संजय मोरे याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते का, यासाठी पोलिसांकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, या अपघातासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत मानली जात आहे. ती म्हणजे चालक संजय मोरे याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा नसलेला अनुभव.
संजय मोरे हा कोरोना काळापासून बेस्टमध्ये कंत्राटी तत्त्वावर कामाला होता. तो बेस्टच्या लहान आकाराच्या जुन्या बस चालवायचा. अलीकडेच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती. साधारण 1 डिसेंबरपासून तो इलेक्ट्रिक बस चालवायला लागला होता. त्यापूर्वी संजय मोरे याला 10 दिवस ही बस चालवण्याचे ट्रेनिंगही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, फक्त 10 दिवसांचं प्रशिक्षण देऊन संजय मोरेला पॉवर स्टेअरिंग असणारी इलेक्ट्रिक बस चालवायला देणे योग्य होते का, असा सवाल आता विचारला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संजय मोरे हा यापूर्वी बेस्टच्या ताफ्यातील लहान आकाराच्या आणि जुन्या बस चालवायचा. या बसेसमध्ये पॉवर स्टेअरिंग नव्हते. त्यामुळे या बसेसचे स्टेअरिंग बऱ्यापैकी फिरवावे लागते. मात्र, संजय मोरे याला अलीकडे जी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती, त्यामध्ये पॉवर स्टेअरिंग होते. पॉवर स्टेअरिंग असलेली वाहने वळवण्यासाठी फार जोर लावावा लागत नाही. स्टेअरिंग हलक्याने फिरवले तरी वाहन लगेच वळते. मात्र, जुन्या स्टेअरिंगची वाहने चालवणाऱ्या व्यक्तींना पॉवर स्टेअरिंग असलेली वाहने चालवण्यासाठी बऱ्याचदा अवघड जाते. पॉवर स्टेअरिंगचा नेमका अंदाज न आल्यास अपघात होण्याचा धोका वाढतो. असाच काहीसा प्रकार कुर्ला येथील अपघातात घडला असावा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत
या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी साडे दहा वाजता एक ट्वीट करून त्यांनी कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली. ‘कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत’, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कालच्या दुर्घटनेत बेस्ट बसमुळे चिरडल्या जाणाऱ्यांमध्ये आफरिन शहा या 19 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. आफरिन हिचा सोमवारी नोकरीचा पहिला दिवस होता. ती कामावरुन घरी परतत असताना बेस्टच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. तर कनीज फातिमा या महिलेचाही अपघातात मृत्यू झाला. त्या एका रुग्णालयात नोकरी करायच्या. काल अपघात घडला तेव्हा फातिमा या रुग्णालयात नाईट ड्युटीसाठी निघाल्या होत्या. ही सगळी माहिती समोर आल्यानंतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावे
कनीज अन्सारी (वय 55)
आफरिन शहा (वय 19)
अनम शेख (वय 20)
शिवसम कश्यप (वय 18)
विजय गायकवाड (वय 70)
फारुख चौधरी (वय 54)
कनीज़ फातिमा
बेस्ट बस तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई होणार?
कुर्ला बस अपघातानंतर संबंधित बेस्ट बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, अशी चर्चा सुरु झाली आहे. बेस्ट प्रशासनाने बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. मात्र, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बस तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी या भयानक घटनेबाबत माहिती दिली. प्रत्यक्षदर्शी कपिल सिंग यांनी सांगितले की, कुर्ला ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी मार्ग क्रमांक 332 ची बेस्ट बस पूर्णपणे भरली होती. बसने प्रथम ऑटोरिक्षाला धडक दिली आणि नंतर एकामागून एक वाहनांना धडक दिली आणि आंबेडकर कॉलनी गेटवर धडकल्यानंतर ही बस थांबली. या घटनेत बसने अनेक पादचारी आणि फेरीवाल्यांना धडक दिली. नेमकं काय घडतंय हे कळण्याच्या आता हे सारं घडलं. लोकांना धक्का बसला होता. ते एखाद्या दहशतवादी हल्ल्यासारखं दिसत होतं. संतप्त जमावाने बसचा पाठलाग करून चालकाला पकडले आणि पोलिस येईपर्यंत त्याला बेदम मारहाण केली, असे कपिल सिंग यांनी सांगितले.