पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे आज पंतप्रधान पदाचा राजीनामा सोपवलाय. १७ वी लोकसभा विसर्जित झाली आणि नुकत्याच १८ व्या लोकसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. आता एनडीएकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. देशातील सर्व मित्रापक्षांसह मोदींनी आज दिल्लीत बैठक घेतले. लोकसभेचा निकाल जाहीर झालाय मात्र निकालात भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे यंदा भाजपला मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. दिल्लीत एनडीएच्या सगळ्याच घटक पक्षांची बैठक पार पडली आणि चर्चेअंती एनडीएने नरेंद्र मोदींना चेहरा म्हणून निवडले आहे तसेच पंतप्रधान पदासाठी सुद्धा मोदींच्या नावाला एकमतांनी मंजूरी देण्यात आली आहे.
भाजपा बहुमतापासून किती दूर?
लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागा मिळवता आल्या आहेत. बहुमतासाठी आणखी ३२ जागांची आवश्यकता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीचे आंध्र प्रदेशमध्ये १६ खासदार निवडून आले आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूचे बिहारमध्ये १२ खासदार निवडून आले आहेत. भाजपाचा आणखी एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे प५ खासदार निवडून आले आहेत. या तीनही पक्षांनी भाजपाला साथ दिली तर भाजपा सहज सत्ता स्थापन करू शकते.
एनडीएच्या मित्रपक्षांनी मंत्रालयांची यादी सादर केली, टीडीपीने 6 मंत्रालये आणि सभापतीपद मागितले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीने 6 मंत्रालयांसह सभापतीपदाची मागणी केली. त्याचबरोबर जेडीयूने 3, चिरागने 2 (एक कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार), मांझीने एक, शिंदे यांनी 2 (एक कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार) मंत्रिपदांची मागणी केली आहे. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी आम्हाला मंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते, असे जयंत यांनी म्हटले आहे. तसेच अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रीपद हवे आहे.
एनडीए संसदीय पक्षाची बैठक 7 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड होणार आहे. यानंतर 8 जून रोजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी बुधवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारसही राष्ट्रपतींनी केली. तसेच नवीन सरकार येईपर्यंत त्यांना आणि मंत्रिमंडळाला पदावर राहण्याची विनंती केली.
याआधी सकाळी 11.30 वाजता मोदी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली.
17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस बैठकीत करण्यात आली. त्यात सरकारने तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल धन्यवाद प्रस्ताव मंजूर केला. यानंतर मोदींनी राष्ट्रपती भवनात जाऊन राजीनामा सादर केला. मोदी आता कार्यवाहक पंतप्रधान असतील.