परभणी – महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कुळवाडीभूषण, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छ.शिवाजी महाराज हे जगातील एक अद्वितीय राजे होते.जगाला आदर्श वाटावे असे शिवरायांचे व्यक्तिमत्व असून स्त्रियांचा आदर करणारे, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष असे जाणते राजे समाजाला आदर्शवत असे शिवरायांचे व्यक्तिमत्व. शिवरायांचे आचार,विचार आज ही समाज आणि जगासाठी प्रेरणादायी आहेत.सर्वसामान्यां विषयी नितांत आदराची भावना असणारे कर्तव्यदक्ष, लोकहितकारी राजे आणि महाराज म्हणूनही छत्रपती शिवराय जगभर ओळखले जातात.असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. नितीन बावळे यांनी केले.
स्वराज्याचे संकल्पक, महाराष्ट्रातील आदर्श मातृत्व, ज्यांनी दोन छत्रपती महाराष्ट्राला दिले, अशा राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी इतिहास विभागाच्या वतीने “छ. शिवाजी महाराज- एक दूरदर्शी राजा” या अनुषंगाने महाराजांचे विचार आणि त्यांच्या जीवन कार्यावर शारदा महाविद्यालय, परभणी चे इतिहास विभाग प्रमुख डॉ.नितीन बावळे यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले, व्यासपीठावर इतिहास विभाग प्रमुख प्रा.महेश जाधव, डॉ.प्रविण नांदरे,प्रा.जयश्री आदमाने आदींची उपस्थिती होती.
राजमाता जिजाऊ माँ साहेब,छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद आणि कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.महेश जाधव यांनी केले.
छत्रपती शिवरायांचे विचार सामान्य माणसाला आत्मोन्नती साठी उपकारक असे आहेत.महाराजांच्या आचार विचारांचा अनुनय आजच्या युवापिढीने करत आदर्श समाज आणि राजवटीच्या निर्मितीचा ध्यास घ्यावा.शिवरायांचा जीवनपट प्रेरणादायी असून महाराजांनी सामान्यांच्या कल्याणा साठी निर्माण केलेली आचरण शैली दिशादर्शक अशी आहे.शिवरायांचे शेती आणि शेतकरी,कष्टकरी ,सैनिक ,
कामगार,स्त्री विषयक समन्वयी,उदारमतवादी, भेदभाव विरहित समतावादी दृष्टीकोण लोककल्याणकारी राज्याची प्रेरक शक्तीच आहे.स्वराज्या कामी योगदान देणाऱ्या शेतकरी, कष्टकरी,सैनिक आणि त्यांच्या कुटुंबा प्रति सहानुभाव असणारे शिवबा जनसामान्यांचे कैवारी होते.आज आपण सर्वांनी शिवरायांच्या विचाराचे, कार्याचे अनुकरण करावे. शिवरायांचे गुण आत्मसात करावे असे मत व्यक्त करत डॉ. नितीन बावळे यांनी शिवरायांचा जीवनपट उलगडून सांगितला.
महाराजांनी रायरेश्वरावर घेतलेल्या स्वराज्य स्थापनेच्या शपथे पासून ते राज्याभिषेका पर्यंतचा शिवरायांचा अफाट आणि थक्क करणारा प्रवास मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
बी. ए. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.अक्षता डहाळे हिने केले.तर आभार बी.ए.व्दितीय वर्षाची विद्यार्थीनी कु.अश्विनी बसुळे हिने आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण नादरे आणि प्रा. जयश्री आदमाने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येनी विद्यार्थिनी सह प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.