श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

परभणी दि.12
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात दि.12 मार्च 2025,बुधवार रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्मिता मगर, डॉ. प्रतिभा शिसोदिया तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. शाहिद ठेकिया, समन्वयक प्रा स्नेहल शेळके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणात दरवर्षी 08 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाचे अवचित्य साधून महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका,महिला कर्मचारी व गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी आपल्या मनोगतातून आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात महिलांचे विविध क्षेत्रात मोठे योगदान आहे. महिलांनी आजच्या विज्ञानवादी युगात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे असा संदेश दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंडे, मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महिलांनी स्वप्ने मोठी पहावी, कोणत्याही संकटांना न घाबरता जिद्द,चिकाटी, तळमळ व कष्ट करण्याची तयारी ठेवून मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल करावी असे प्रतिपादन केले.

डॉ. स्मिता मगर मार्गदर्शनातून महिलांनी आपले उत्तम आरोग्य सांभाळून आपापल्या क्षेत्रात कष्ट जिद्द व सातत्य ठेवून यश संपादन करावे यासोबतच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी जीवन जगावे असा संदेश यावेळी त्यांनी दिला. व डॉ.प्रतिभा सिसोदिया यांनी महिलांनी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी तसेच उत्तम आरोग्य कसे ठेवावे याबद्दल बहुमोल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात महिला दिनाची औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा परिधान करून महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमास विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुगंधी शर्मा यांनी केले तर कु. समृद्धी सुदेवाड यांनी आभार मानले.

Comments (0)
Add Comment