काहीतरी घडतंय…राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमव

मुंबई, 17 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दलच्या बातम्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता अजित पवारांनी पुरंदर दौरा रद्द केलेला असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार मुंबईत देवगिरीला आहेत. उष्माघाताचा उपचार घेत असलेल्यांची भेट घेऊन ते रात्री तीन वाजता घरी पोहचले. त्यामुळे  पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याला देखील अजित पवार गेले नाहीत.  त्याआधी वडकी, दिवे, भिवरी, बनपुरी या गावांमध्ये त्यांचे  कार्यक्रम होणार होते. मात्र अजित पवारांचे आजचे वडकी, दिवे, भिवरी, बनपुरी या गावातील कार्यक्रम रद्द झाले आहेत.सासवडमधील कार्यक्रमास देखील ते उपस्थित राहण्याची शक्यता नाही.  अजित पवारांच्या अनुपस्थितीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. अजित पवार अद्यापही मुंबईत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईला निघाले आहे. पक्षाची बैठक असल्याचा आमदारांना निरोप मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात असताना मुंबईत बैठक कशी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शरद पवारांच्या अपरोक्ष मुंबईत बैठक बोलावण्यात आलीय का अशीही चर्चा सुरु झाली आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड हे मुंबईत बैठकीसाठी निघाले आहे. पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पाहत असल्याचं सांगितलंय.

राष्ट्रवादीचे हे आमदार कोणत्या गोड बातमीच्या प्रतीक्षेत आहेत असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. ‘पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आपण मुंबईकडे जात आहोत’, असे ते म्हणाले.

सध्याच्या घडामोडीवर त्यांनी भाष्य करण्याचा टाळलं मात्र लवकरच आनंदाची बातमी मिळणार असल्याचं सांगत आमदार बनसोडे यांनी सूचक विधान केल्याने नेमकं राष्ट्रवादीमध्ये काही तरी चाललंय हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान आता यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश देव धर्माला मानणारे आले तर त्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावं लागतं असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Comments (0)
Add Comment