सुभाष साबणेंनी ताकाला जाऊन भांडे लपवू नये!-आ.अमर राजूरकर यांची टिका

आधी तिकीट नंतर प्रवेश, आता कुठे गेली नैतिकता?

गजानन जोशी
नांदेड,दि 03 ः
आमदारकीच्या लालसेपोटी सुभाष साबणे यांना भाजपात जायचे असेल तर खुशाल जावे;पण त्यासाठी अकारण अशोक चव्हाणांना जबाबदार ठरवू नये. ‘ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा’ साबणेंचा हा उद्योग म्हणजे शुद्ध बनवाबनवी असल्याचे सांगत नैतिकतेचा आव आणणाऱ्या भाजपने आधी तिकीट देवून नंतर पक्ष प्रवेश सोहळा ठेवला आहे.
आता कुठे गेली भाजपाची नैतिकता? असा सवाल विधान परिषदेचे प्रतोद व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी केला आहे.

मंत्री अशोक चव्हाणांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात भाजपात प्रवेश करणार असल्याच्या सुभाष साबणे यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. आ.राजूरकर म्हणाले की,देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुरुवातीपासूनच निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करून सुभाष साबणेंवर जाळे फेकले होते. दुर्दैवाने मृगजळाला बळी पडून साबणे त्या जाळ्यात फसले आहेत. मला आमदारकी लढायची आहे म्हणून मी भाजपात चाललो,हे प्रामाणिकपणे सांगण्याची हिंमत तरी साबणेंनी दाखवायला हवी होती. पण त्यासाठी त्यांनी मंत्री अशोक चव्हाणांचा विरोध आहे किंवा शिवसेनेशी वैर नाही वगैरे भूलथापा मारून मतदारांची फसवणूक अन् दिशाभूल करू नये.

मुळात अशोक चव्हाणांची जिल्ह्यात कोणतीही एकाधिकारशाही नाही. ते राज्याचे नेते आहेत व जेव्हा-जेव्हा ते सत्तेत राहिले,तेव्हा नेहमीच त्यांनी आपल्या गृह जिल्ह्याच्या भरीव विकासासाठी काम करून दाखवले आहे. मागील पाच वर्षे नांदेड जिल्ह्याचा विकास खुंटला होता. अशोक चव्हाण पुन्हा सत्तेत आल्यानंतर रखडलेल्या कामांना गती तर मिळालीच;शिवाय अनेक नवीन प्रकल्प मराठवाडा व जिल्ह्यात येत आहेत. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार भक्कमपणे अशोक चव्हाणांना साथ देत आहेत. विकासाच्या प्रकल्पांना सहकार्य केल्याबद्दल स्वतः चव्हाणांनी अनेकवेळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबद्दल जाहीरपणे प्रसंशोद्गार काढले आहेत,याचेही स्मरण आ.अमर राजूरकर यांनी याप्रसंगी करून दिले.
दोनच दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांनी सुभाष साबणेंप्रती विश्वास व्यक्त केला होता. साबणे सच्चे शिवसैनिक आहेत;ते शिवसेना सोडणार नाहीत,असे चव्हाण म्हणाले होते. खा.संजय राऊत यांनी सुद्धा आम्ही साबणेंना समजावण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. परंतु,आमदारकीच्या मोहापोटी सर्वांच्या विश्वासाला तडा देत साबणे यांनी भाजपात प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे.त्यांना हव्या त्या पक्षाकडून निवडणूक लढण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र त्यासाठी त्यांनी बिनबुडाची कारणे सांगून इतरांना दोष देऊ नये,असे आ.अमरनाथ राजूरकर यांनी सांगितले…

Comments (0)
Add Comment