शब्दराज ऑनलाईन,दि 03ः
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मुंबईत एका हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीच्या संदर्भात अटक केली. तत्पूर्वी, त्याला ताब्यात घेण्यात आले आणि सुमारे 4 तास चौकशी केली. आर्यनला वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. टीम आर्यनला हॉस्पिटलच्या इमर्जन्सी गेटमधून आत घेऊन गेली.विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना अटक केली आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एनसीबीने आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी चौघांची चौकशी झाली असून त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इतर चार जणांची एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे.
त्या तिघी दिल्लीहून आल्या
क्रूझ मुंबईवरून गोव्याला जात होते. शनिवारी दुपारी क्रूझ निघाले होते. 4 ऑक्टोबर रोजी ते मुंबईत येणार होते. तीन दिवस ही पार्टी चालणार होती. या पार्टीसाठी दिल्लीहून तीन मुली आल्या होत्या. या तिघींची कसून चौकशी सुरू आहे. या तिघीही उद्योगपतींच्या मुली आहेत. एनसीबीने या मुलींचेही फोन जप्त केले आहेत. फोनमधील चॅटची कसून तपासणी केली जात आहे. तसेच एनसीबीच्या दिल्ली हेडक्वॉर्टरमधून या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणात न्यायसंगत आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली जाईल. ड्रग्जप्रकरणात ज्यांचा सहभाग असेल त्यांच्याविरोधात कारवाई होणारच, असं एनसीबीने स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितलं.वैद्यकीय चाचणीनंतर आरोपींना जिल्हा कोर्टात हजर केलं जाईल. तिथे त्यांच्या कस्टडीची मागणी केली जाईल. एनसीबी अधिकाऱ्यांकडून किती दिवसांची मागणी केली जाते हे महत्त्वाचं आहे. कोर्टात आता नक्की काय घडेल ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण गेल्या दोन वर्षातील ही मोठी हाय प्रोफाईल केस आहे.