दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दारु घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल बाहेर येणार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाल्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर येणार आहेत. ही आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीसाठी जमेची बाजू आहे. अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मोकळीक दिली आहे. लोकसभेसाठी 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहे. अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण कराव लागेल
अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Singhvi) यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रचार 48 तास अगोदर संपतो, असं सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला. अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत, अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये 25 मे तर दिल्लीत 1 जूनला मतदान पार पडणार आहे.
अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर कधी येणार?
अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर न्यायालयाचा आदेश ट्रायल कोर्टात पाठवला जाईल. त्यानंतर ट्रायल कोर्टाकडून सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाकडे पाठवला जाईल. तिहार तुरुंग प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अरविंद केजरीवालांना सोडलं जाईल. तिहार तुरुंगात दररोज येणारे सर्व सुटकेचे आदेश सुमारे 1 तासात निकाली काढले जातात. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांची आजच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
21 मार्च रोजी ईडीकडून झालेली अटक
ईडीनं अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घरी छापा टाकला होता. काही तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना अटक केली होती. त्यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आक्रमक निदर्शने केली होती. मध्यंतरीच्या काळात केजरीवाल यांनी जामिनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश मिळाले नव्हते. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिल्याने अरविंद केजरीवाल दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगाबाहेर येणार आहेत. हा आम आदमी पक्षासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.