मुंबई – राज्यसभा निवडणुकीचा निकाला लागला आहे. या निवडणुकीत धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. या निकालावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान या निवडणुकीवरून आता आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणूक… ठाकरे यांचे माफिया सरकार चे काउन्ट डाऊन उलटी गिनती सुरू
Rajyasabha Election Result.. Thackeray Sarkar Mafia Sarkar’s Count Down Started @BJP4India @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 11, 2022
‘ठाकरे यांचे माफिया सरकारचे काउन्ट डाउन, उलटी गिनती सुरु’ असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे चारही उमेदवार विजयी होतील असा दावा केला होता. मात्र, निकालानंतर त्यांचा हा दावा फोल ठरला. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार यांना प्रबळ उमेदवार मानले जात होते.
महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही भाजपाने सहाव्या जागेवर आपला उमेदवार धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणले. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजपाने शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे. आमच्या तिसऱ्या उमेदवाराला संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं मिळाली असा खोचक टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.
तर संजय राऊत यांनी सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने जरी सहावी जागा जिंकली तरी त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महाडिकांचा विजय झाला आहे.
मात्र, भाजपाकडून हा मोठा विजय असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार झाला असता तर आम्ही जिंकलो असतो. असो, तरीही त्यांचे अभिनंदन असे राऊत म्हणाले.