ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन

मुंबई : लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील फणसवाडीतील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने लावणीचा ठसकेबाज आवाज हरपल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होतेय. लावणीला ठसकेबाज सूरात लोकांपर्यंत पोहचवण्यात सुलोचना चव्हाण अतुलनीय योगदान राहिलं. त्यांच्या जाण्याने कलाविश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यामुळे लावणीचा ठसकेबाज आवाज हरपल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होतेय.

सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता मुंबईच्या मरीन लाईन्स इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

सुलोचना चव्हाण यांची लावणी लोकांच्या पसंतीस उतरत होती. लावणी गायिका अशी ओळख घेऊन जगणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या डोक्यावरचा पदर कधीही खाली सरकला नाही. डोक्यावर पदर अन् मुखी लावणीचे ठसठशीत बोल अशी त्यांची प्रतिमा लावणी रसिकांच्या मनावर चिरंतन कोरलेली राहील.

सुलोचना चव्हाण यांची गायकी आणि जयश्री गडकरी यांचं सादरीकरण ज्या लावणीला लाभलं ती लावणी अजरामर झाली. या जोडीला एकत्र अनुभवनं म्हणजे लावणीचा परिपूर्ण अनुभव घेणं होतं.

ज्या काळात तमाशापटांना एक वेगळी उंची होती. त्याकाळी सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्या लोकांच्या मनात घर करू लागल्या अन् आजही त्यांची लावणी मनाला मोहिनी घालते.

सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या काही लावण्या

तुझ्या उसाला लागेल कोल्हा…

पाडाला पिकलाय आंबा

फड साभांळ तुऱ्याला गं आला

मला म्हणत्यात पुण्याची मैना

पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा

कसं काय पाटील बरं हाय का?

सुलोचना चव्हाण यांचा जीवनप्रवास

सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 ला मुंबईतील गिरगावमध्ये झाला. त्यांनी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलं.  मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती नाटकांमध्ये त्यांनी बालकलाकाराच्या भूमिकाही केल्या. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गायकीला सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी मन्ना डे यांच्यासोबत भोजपुरी रामायण गायलं.  12 ऑगस्ट 1953 ला त्यांनी श्यामराव चव्हाण यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या आधी त्यांनी 70 हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं होतं. त्यानंतर त्यांच्या कामाचा आलेख उंचावत गेला.

आचार्य अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांच्या गायकीचा गौरव करताना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब त्यांना दिला होता.

लावणीसोबतच त्यांनी भावगीतं आणि भक्तीगीतं देखील गायली. त्यांनी कायम संगीताची सेवा केली. बाज कुठचाही असो पण सुलोचना चव्हाण आपल्या गायकीने त्याला वेगळी उंची प्राप्त करून दिली.

पद्मश्री पुरस्कार देत भारत सरकारने सुलोचना चव्हाण यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला आहे.

Comments (0)
Add Comment