नव्याची हौस प्रत्येकालाच असते. सूर्य रोज उगवतो आणि रोजच मावळतो; तरीही “तांबडं फुटताना” सर्वांना ते पाहणे आवडते आणि “प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी “, कवी कुसुमाग्रज यांच्या या ओळींप्रमाणे मावळत्या सूर्यालाही आपण हात जोडतो. पेरलेले उगवते, उगवलेले मावळते अन् मावळलेले उगवते असा हा जीवनक्रम सुरूच राहतो. त्यामुळे २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत करण्याची हौस आणि २०२४ या सरलेल्या वर्षाला ‘गंगेत घोडे न्हाले ‘ म्हणून ‘आनंदाचा ठेवा ‘ समजून जपण्याची हौसही आपणच जपतो. संकल्प आणि सिद्धीचा झोका या वर्षाकडून त्या वर्षाकडे झुलत असतो. माणसाचे जीवनही असेच झुलते आणि भुलतेही. माणसांनी-माणसांना प्रेमाने-आनंदाने झोके द्यावेत आणि जीवनाचा-कार्याचा झोका आभाळात उंच जावा, हीच सर्वांची एकमेकांप्रती सदिच्छा असते. “नवीन वर्ष आपणांस भरभराटीचे जावो!” या शुभेच्छा माणसांच्या भल्यासाठीच असतात. सदिच्छा आणि शुभेच्छा या जुळ्या बहिणी असल्या तरी आपल्या भारतीयांसाठी-एकमेकांसाठी खूपच छान आहेत. कारण मानसिक पातळीवरचा दिलासा आणि ऊर्जा अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतात. आपल्या जीवनातील आपलेच-माणसांचेच अनुभव आपणांस जगण्याची रीत आणि प्रीत शिकवतात. काही अनुभवांवरून आपल्याही लक्षात या गोष्टी येतात. काही अनुभव या निमित्ताने मी सांगत आहे.
गुरुजी वर्गात आले आणि पहिलीच्या वर्गातील नम्रताने आपल्या हातातील दोन चॉकलेटपैकी एक चॉकलेट गुरुजींच्या तळहातावर ठेवले. गुरुजींना नम्रता म्हणाली,”गुरुजी, तुम्ही आम्हांला रोज खायला बिस्किटे देता. आज मी तुम्हांला खायला एक चॉकलेट दिले आहे, नववर्षाच्या निमित्ताने!” नम्रताचे हे निरागसपणाचे बोलणे ऐकून गुरुजी मनातून आनंदित झाले आणि त्या चिमुकलीचे गुरुजींनी नंतर स्वतः जवळचे दोन चॉकलेट देऊन कौतुकही केले. सांगायचा भाग असा आहे की, पहिलीच्या वर्गातील मुलांना हूरहूर वाटते. त्यांचे अभ्यासात मन लागावे. लेकरं शाळेत रमावीत. लेकरं आणि गुरुजी एकरूप व्हावेत. लेकरं शिकावीत आणि संस्कारित व्हावीत, याकरिता गुरुजी मुलांना दररोज खाऊ खायला द्यायचे. मुलांना आनंद व्हायचा. गुरुजींनी मुलांच्या काळजात आनंद पेरला होता आणि तो आनंद विद्यार्थिनीच्या कृतीतून परत गुरुजींच्याच वाट्याला आला. आनंद पेराल तर आनंदच उगवेल.” हेच या उदाहरणावरून आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे.
नवे वर्ष प्रारंभ झाले की, सर्वजण त्या वर्षाचा काही ना काही संकल्प करतात. जरूर… संकल्प केलाच पाहिजे. कारण माणसाला नाविन्याची ओढ असते, ती गोड वाटते. रुक्षपणा टाळून उत्साहाने जीवन जगण्यासाठी आवडीच्या गोष्टी आतून जपण्यासाठी संकल्प करणे महत्त्वाचे आहे. संकल्प सिद्धीसाठी मात्र स्वतः सहज आणि सरळ वागणेही महत्त्वाचे आहे. पण व्यवहारात माणूस घराच्याबाहेर पडला की, साशंकतेनेच जगाकडे पाहतो. इथूनच मग मनाचा अबाधितपणा बाधित होत असतो. चाकरमान्यांकडे पाहिले की, त्यांच्या वर्तनावरून या गोष्टी आपल्या चटकन् ध्यानात येतात. ‘काय करावे हो? ‘ या प्रश्नाने सुरू झालेले रडगाणे रडगा-हाण्यांनी आयुष्यभर संपत नाही. त्यामुळे स्वतः जवळचा आनंद स्वतःलाच पारखा होतो. इतरांकडून आनंदप्राप्तीची आशा ठेवल्यामुळे त्याच्या शोधातच वर्षातील कितीतरी दिवस वाया जातात. वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील एक दिवस अर्थातच, ३१ डिसेंबर रोजी रात्रभर मद्यधुंद अवस्थेत जागरण केल्याने आनंद मुळीच मिळत नाही. आयुष्यात हरेक दिवस आनंदात पार पाडला पाहिजे, तो आपल्या कार्याने आणि कार्य करून आपल्या आवडीच्या छंदाने.
जगाचे जाऊ द्या, “शेतकऱ्याचा कायमस्वरूपी शेतात स्वतः राबण्याचा”, असा एकच संकल्प असतो. शेतकरी मात्र जगाकडे नव्हे, तर स्वतःच्या आत डोकावून सतत राबत असतो. त्याचे कष्ट प्रामाणिक असतात. इतरांना तो कधीही सरळ नजरेनेच पाहतो आणि त्यांच्याशी सरळपणानेच वागतो. व्यावहारिक पातळीवरून तो माणुसकीच्या पातळीवर वर्तन करत असल्यामुळे त्याच्या पदरात आनंद शब्दशः सुखाने डोलतो. जगाला हे जाणवते पण जगातील इतर माणसे स्वतः शेतकऱ्यासारखे जगत नाहीत.
याबाबतीतला अनुभव सांगतो.
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. पहाटे मी ‘रानमेवा ‘ मळ्यात जाताना रस्त्यात भाजीपाला आणि फळे खरेदी-विक्रीचा दैनंदिन बाजार (बीट) लागतो. सहज बाजारामध्ये कधीमधी डोकावून पाहतो. आता असाच एके दिवशी वाट वाकडी करून गेलो बाजारात.३००/-रुपये शेकडाप्रमाणे म्हणजे, ३००/-रुपयांना १०० मेथीभाजी जुड्यांची विक्री होत होती. आडत्या मोजून मेथीच्या जुड्या खरेदीदाराला देत होता. खरेदीदाराने व्यवस्थित जुड्या मोजून घेतल्यानंतरही परत पस्तुरी म्हणून जास्तीच्या आणखी १० जुड्या त्या शेतकऱ्याच्या बळेच घेतल्या. व्यवस्थेतही असाच शेतकऱ्याचा सगळीकडे ‘बळी’ जाताना दिसतो. इथेही शेतकऱ्याचा ‘बळी ‘ गेलाच होता. नंतर मात्र खरेदीदार हुशारीने मेथीभाजीच्या जुड्या विकू लागला. विक्री करताना तीन रुपयांची एक जुडी असताना दहा रुपयाला एक जुडी म्हणून ओरडू -ओरडू विकू लागला. कुणी घासाघीस करून दहा रुपयांच्या दोन जुड्या मागू लागले, तर तो व्यापारी म्हणू लागला की,”साहेब, घ्या दहा रुपयांच्या दोन जुड्या. तुम्ही आपले पक्के गिऱ्हाईक हायेत!”
हे दोन्ही दृश्ये पाहून मी थोडा नाराज झालो. रात्र न् दिवस मेहनत करून शेतकऱ्याचा माल पस्तुरीत जास्त घ्यायचा आणि भावातही आखडता हात घेऊन विक्री करताना मात्र पक्का नफा कमविण्याच्या नादात व्यवहार जपायचा, हे मला खटकत होते. इथेच त्या व्यापाऱ्याने “आनंदाचा लिलाव ” केलेला होता. व्यापाऱ्याला शेतकऱ्याला लुटून जास्तीचा नफा कमवावा वाटत असेल, पण शेतकऱ्याच्या काळजाला दुःखाच्या डागण्या देऊन त्याला “जीवनाचा आनंद ” कसा मिळेल? पैसा कमावणे हा व्यवहार आहे. कष्टाने पैसा कमावणे हा “आनंद ” आहे.
परत दुसऱ्या पहाटेच मळ्यात जाताना रस्त्यावर भल्यामोठ्या कालव्याच्या पुलावर तोच व्यापारी गाड्यावर भाजीपाला विक्री करत होता. त्याला गिऱ्हाईक भांडत होते. एकाचा राग तर अनावर झाला आणि त्याने त्या व्यापाऱ्याच्या मुस्कटात एक हाणली. मी जवळ जाऊन पाहिले तर, व्यापाऱ्याने तराजूच्या भाजी ठेवायच्या लोखंडी पारड्याला खालून चुंबक लावलेले आहे, हे मला त्या गिर्हाईकाने सांगितले. अनेक गिर्हाईक चिडले आणि त्यांनी रागाच्या भरात व्यापाऱ्याला आणखी बदडून काढलेले सर्वजण पाहत होते. इथे सर्वांचीच “माणुसकी” बधिर झालेली होती.”इमानदारी”चा वाली कुणीच दिसत नव्हते. नंतर काही आगावू पोरांनी त्या व्यापाऱ्याचा भाजीचा गाडाच लुटून नेला. तेवढ्यात तिथे पोलिसांची गाडी आली. जमलेल्यांची पांगापांग झाली. ज्यांनी पैसे देऊन भाजीपाला खरेदी केला होता, त्यांची चिल्लर भाजी विक्रेता परत देत असतानाच मारहाणीची घटना घडल्यामुळे ते तिथेच उभे होते. पोलिसांना हे माहीत नव्हते. गाडा लुटणारे पळाले आणि पोलिसांनी खऱ्या ग्राहकांनाच सटके लावले. पोलिसांना जेव्हा त्या खऱ्या ग्राहकांनी आपली खरी बाजू सांगितली, तेव्हा पोलिसांना त्यांचा खरेपणा कळाला. पण वेळ निघून गेलेली होती. शिकलेल्या आणि शहाण्या समाजात जर अशा घटना घडत असतील आणि आणखी घडणार असतील तर, त्या-त्या वेळी आनंदाची बरकत कशी टिकेल? सत्य परेशान झाले की, माणसं खोट्याची सावली खरी मानतात. असेच व्हायले आता सगळीकडे.
माणसाने स्वतः इतरांनी आपल्याशी नीट वागावे, तरच आपण इतरांशी नीट वागू, अशी वृत्ती ठेवलेली असते. अनेकदा नीट वागणाऱ्यांना ‘बावळट’किंवा ‘भाबडे’समजले जाते. मी माझे नीट वागेल आणि माझ्या वाट्याला आलेले काम नीट पार पडेल, अशा सेवावृत्तीने ज्यांचे आचरण असते, अशा माणसांना जग जवळ करते. याउलट इतरांना किंवा व्यवसायात लुबाडणूक करून आर्थिकदृष्टीने श्रीमंत असलेल्या माणसांमध्ये जगाच्या नजरेला नजर भिडवून बघण्याची बिशाद नसते. अगदी साध्या घरात राहत असलेल्या कष्टाळू माणसाला जेव्हा भले-भले नमस्कार करतात, त्यावेळी त्या माणसाचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास फुलून आलेला असतो. स्वतः कष्टणारे हात भ्रष्टाचार करतच नाहीत. कारण कष्टाने माखलेल्या हातात आणि मनात “सत्याचा उजेड” सदैव चमकत असतो. आईतखाऊ भ्रष्टाचार करून कमावीत असतील पण त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कुठेच आणि कधीच नजरेला पडत नाही. तोंडावर गोड बोलून स्वतःच्या फायद्यासाठी चामडी बचावू असणारे पळपुटे असतात. अशांपासून दूर राहिले की, चांगली कामे करता येतात.
जगात चांगली माणसेही आपल्या भवताल मस्त नांदतात. माझ्यासारख्यांच्या शेतधुऱ्याला येऊन, मालकांना विचारून गवताचा चारा काढणाऱ्या, झाडपाल्याचा चारा काढणाऱ्या कष्टवंत आयाबाया घरातून सकाळी-सकाळी फक्त चहाचा घोट घेऊन बाहेर पडतात. दुपारी ३-४ वा. चारा काढून भलामोठा भारा बांधतात. शेताच्या रस्त्यालगत बसून मनसोक्तपणे पालवात बांधून आणलेली शिळी भाकर-भुरकी आणि लोणच्याची फोड खातात. त्यांना अशी कष्टाची भाकर खाल्ल्यामुळे मनःशांती लाभते. याउलट टेबलाखालून पाकिटात पैसे घेणारे सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधतात. ते पैसा खातात आणि जीवालाही खातात; खऱ्या अर्थाने ते त्यांचे स्वतःचे जीवन खातात. त्यांना कुठेतरी अनैतिक मार्गाने पैसा घेतल्याची रुखरुख लागलेली असते. मन थाऱ्यावर राहत नाही. मनाचे परिणाम शरीरावर होतात. त्यांना अनेक रोगांची लागण होते, त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढीस लागतो. “हापापाचा माल गपापा” म्हटल्यासारखे त्यांना रुग्णालयात पैसा खर्च करावा लागतो. शरीर आणि मन खिळखिळे होते. अशी माणसे लेकराबाळांवर कोणते संस्कार करणार? त्यांच्या घरातील महिलांना मुक्तपणे वावरता येत नाही. भ्रष्टाचारी पतीसोबत पत्नी दुचाकी किंवा चारचाकीमध्ये बसून जात असताना त्यांना लोकांच्या नजरा काट्यावानी टुचूटुचू टोचतात. त्यांच्या घरात कौटुंबिक कलह वाढतात. पापभीरू माणसं जेवणाच्या पंगती उठवतात, दान करण्याचा बेतालपणा करतात. तरीही त्यांना जे भोगायचे ते भोगावेच लागते.
याउलट कधीकधी आपण वाचतो आणि ऐकतो की, रिक्षावाल्याचा-मजुराचा-शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी जिल्हाधिकारी होतात, वैद्यक, अभियंता होतात. इतकेच काय ? तर परदेशात नौकरी किंवा व्यवसायात पदार्पण करून सन्मानाने पैसा कमवितात. अशावेळी सर्वांच्या लक्षात येते की, त्या कुटुंबातील चांगल्या माणसांचा चांगुलपणा पुढच्या पिढीच्या कामाला आला. कष्टं पाहिलेली आणि कष्टाने मोठ्या पदांवर कार्यरत असणारी पिढी सदैव जागरूक राहून आपली कार्ये पार पाडत असते. “संस्कारांचे देणं ” हे असे असते. संकल्प करायचे असतील तर ते स्वकडून समाजाकडे गेले पाहिजेत. संकल्प समाजाभिमुख करावेत, माणसांची मान्यता पावणारे करावेत, अशाही कामांची नोंद समाज चांगल्या पद्धतीने घेत असतो. अनाथालये, एड्सग्रस्तांसाठी सेवालये, निराधार माणसांसाठी निवारे, कुष्ठरोग्यांसाठी कुष्ठधामे ज्यांनी-ज्यांनी उभी केली, तिथे-तिथे त्या देवगुणी माणसांनी मानवालये उभी केलेली आहेत. शेती-संस्कृती-कला-क्रीडा-साहित्याचे संवर्धन करणाऱ्या संस्थांची जपणूक करण्याचे संकल्प जपले पाहिजेत.
वर्षभर चहाच पिणार नाही, पहाटे लवकर उठून फिरायलाच जाईल, आरोग्य जपेल, जुगार खेळणार नाही, व्यसने करणार नाही, पर्यटनाला जाईल, निसर्गात रमेल, बागकाम करेल, धार्मिक कथा श्रवण करेल, अभ्यासच करेल, वाचनच करेल, लेखनच करेल, चांगले संगीत ऐकेल, उत्तमोत्तम सिनेमे पाहील, आई-वडिलांचा सांभाळ करेल, डिजिटल डीटॉक्स (भ्रमणध्वनी आणि लॅपटॉप वापरण्याचा अतिरेक टाळून अगदी योग्य वेळी आणि योग्य कामांसाठी वापर करणे) इत्यादी-इत्यादी संकल्प करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचा उत्पादित माल योग्य मोबदला देऊन खरेदी करेल, गावाकडे जाऊन भावासोबत शेतात राबेल, कर्मकांडे करण्यापेक्षा देवालयात जाऊन स्वच्छता करेल, शुद्ध आचरण करेल, कुणाचा खतूस करणार नाही, लावालाव्या करणार नाही, अफवा पसरविणार नाही, कुणाला कमी लेखणार नाही, गुणग्राहकता जपेल, स्वतःच्या घरापासून स्वच्छता जपेल, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणार नाही, कामे करण्यासाठी चिरीमिरी खाणार नाही, जातीय किंवा धार्मिक दंगलीत क्रूरकामे करणार नाही, गरजेनुसार पाणीवापर करेल, गड-किल्ले पाहायला गेल्यानंतर ते फक्त पाहील आणि त्यांच्यासारखे चांगले स्थापत्त्य निर्माण करेल, पुस्तकांतील -संविधानातील मूल्ये स्वतः पालन करेल, स्त्री सन्मान जपेल, गुणीजनांचा आदर करेल, साठेबाजी-नफेखोरी करणार नाही, नदीचे आणि समुद्राचे प्रदूषण करणार नाही, झाडे लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, किमान झाडे तोडणार नाही, कुणाचे फुकटाचे खाणार नाही, बडेजाव करून जगाच्या डोळ्यांत धूळफेक करणार नाही, विज्ञानाचा कार्यकारणभाव जाणेल, कर्माचा आणि माणुसकीचा धर्म जपेल, भ्रूणहत्या करणार नाही, वासनांध होणार नाही, दलाली करणार नाही, समाजाची शांतता आणि सुव्यवस्था खराब होणार नाही याकरिता कंपूशाही, जातशाही, धर्मशाही, सत्ताशाही यापासून दूर राहील, मुक्या प्राण्यांवर दया करेल, यासारखे अनेक संकल्प ज्याला-त्याला आपापल्या परीने पार पाडता येतात. दुसऱ्याकरिता आनंद आचरणाचे सौजन्य जपता नाही आले तरी, काही देता नाही आले तरी काही बिघडत नाही. किमान त्यावर विरजण घालू नये. त्यामुळे स्वतःच्या जीवनात शरीरामध्ये येणारा रक्तदाब-हृदयविकार आणि मानसिक विकृतपणा टाळता येईल. खून-लुटालुट न झाल्यामुळे पोलीस केस-न्यायालयांतील चक्करा टळतील. पैसा वाया जाणार नाही. तोच पैसा आपल्या चांगल्या गरजांसाठी वापरता येईल. सगळ्या गरजा आहे त्या मिळकतीत भागवल्या, तर शांतीचा झरा आपल्याच घरा येईल. हा “मूळचाचि झरा ” शाश्वत आनंदी जीवनाचा स्त्रोत आहे. हा स्वस्त्रोत आटू दिला नाही की, आपणच दस्तूरखुद्द आनंदाचा उजेड होतो आणि इतरांसाठी आनंदाची सावली! “सर्वांसाठी उजेड आणि सावली” जपता येईल हाच खरा संकल्प आहे.
संकल्प करणे म्हणजे खऱ्या अर्थाने खरा विचार आचारातून सिद्ध करणे, हे अपेक्षित आहे. विनोबा भावे सांगतात की,”विचारांची ज्योत विझली तर आचार आंधळा बनतो.”
स्वतः स्वतःच्या विचारांची ज्योत पाजळत ठेवत आचाराने संकल्प पालनकर्ता होऊयात! आम्ही तर शेतकरी आहोत!
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!
-अरुण चव्हाळ, परभणी.
७७७५८४१४२४…