महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे समजण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहाली लागेल, असं दिसतेय. कारण, मुंबईमध्ये महायुतीची आज होणारी बैठक रद्द झाली आहे. मुंबईमधील बैठकीत मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता होती. त्याशिवाय कोणाला कोणतं मंत्रीपद दिले जाणार? हेही निश्चित होणार होतं. महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाची पेच आणखी वाढला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याची बातमी समोर येत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे हे साताऱ्यासाठी निघाल्यामुळे महायुतीची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.
अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महायुतीचे नेते, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंबईत परतले होते. त्यानंतर आज मुंबईत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींवर सोपविल्यानंतर शिवसेनेकडून (शिंदे) गृहमंत्री पदावर दावा केला जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट हे उघडपणे गृहखाते एकनाथ शिंदेंकडे द्यावे, ते कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम व्यक्ती आहेत, असे सांगत आहेत.
एकनाथ शिंदेंचा पडलेला चेहरा चर्चेचा विषय-
काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा झाली होती. यावेळी झालेल्या फोटोसेशनवेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली चर्चेचा विषय ठरली होती. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढताना एकनाथ शिंदे यांचे खांदे पडलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह दिसत नव्हता. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांचा पडलेला चेहरा दिल्लीतील राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल,तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.