परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ः
महाराष्ट्राला संस्कृती, धर्म, वैचारिकतेची परंपरा आहे. परंतु चिकित्सेची परंपरा खंडित झाली असून ती पुढे नेण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती 30 वर्षांपासून करत आहे. मात्र, आजची परिस्थिती पाहता प्रश्न विचारणारी मनेच राहिलेली नाहीत. अशी मने निर्माण करायची करण्यासाठी मुलांमध्ये चिकित्सक वृत्ती वाढली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.
परभणीत शुक्रवारी (दि.16) संध्याकाळी आयएमएच्या सभागृहात ‘सुशिक्षितांच्या अंधश्रध्दा’ या विषयावर डॉ.दाभोलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक रागसुधा आर. होत्या. विचारपीठावर अंनिसच्या सदस्या नंदिनी जाधव, जिल्हाध्यक्ष डॉ.रविंद्र मानवतकर, डॉ.रामेश्वर नाईक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, डॉ.परमेश्वर साळवे, परभणी आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनिल कान्हे, प्रल्हाद मोरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांची उपस्थिती होती.या प्रसंगी दाभोलकर म्हणाले, परभणी जिल्ह्यात अंनिसच्या माध्यमातून मोठे काम झालेले आहे. गंगाखेडातील यज्ञभुमी परिषद, मराठवाडा भानामती निर्मूलन मोहीमेची उदाहरणे देत राज्यातील पहिले करणी भानामती उपचार व संशोधन केंद्र परभणीत स्थापन झाल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक आजार जडलेल्या लोकांचे भोंदूबाबांकडून शोषण केले जाते. जुन्या काळात अंधश्रध्दांविरोधात अंनिसने 35 ते 40 वर्षे नेटाने यशस्वी लढा देत महत्वपूर्ण कार्य केले आहे. आता काळानुसार भोंदूबाबा, मांत्रिकांनी आपले रुप बदलले आहे. आज सुशिक्षित मंडळींमध्येही निरनिराळ्या अंधश्रध्दा वाढत असल्याचे सांगून देश-विदेशातील काही किस्से त्यांनी यावेळी सांगितले. जिथे विज्ञानाचा दुरुपयोग करून शोषण केले जाते. अशांविरुद्ध काम करणे हा या अंधश्रद्धा निर्मूलनाचा मुख्य उद्देश आहे. जादूटोणाविरोधी कायद्याची काय गरज, असेही बोलले जात होते. मात्र हा कायदा किती आवश्यक आहे. हे या कायद्यानंतर शेकडो भोंदूबाबांना पकडल्यानंतर समोर आले, असेही ते म्हणाले.
नंदिनी जाधव यांनी आपण राबवत असलेल्या जटामुक्त अभियानातील विविध ठिकाणचे अनुभव कथन करत आतापर्यंत राज्यात 258 महिलांच्या डोक्यावरील जटा काढून टाकल्याचे सांगितले. कौंमार्य परिक्षेचा भयानक प्रकार सांगत आजही जात पंचायतींचे वास्तव कमी झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुशिक्षितांमध्ये अनेक अंधश्रध्दा असून गुप्तधनासाठी उच्चशिक्षितही मांत्रिकांना बळी पडून कशा रितीने प्रसंगी आपले आयुष्य देखील गमावून बसतात, याचीही उदाहरणे दिली. डॉ.रामेश्वर नाईक यांनीही मनोगत व्यक्त करत अंनिसच्या कार्यात सर्वांनी सहभागी होवून डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे कार्य पुढे न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.जगदीश नाईक, मुंजाजी कांबळे , डॉ.सुनील जाधव , प्रा. माणिक लिंगायत, प्रा. डॉ. चंद्रकांत गांगुर्डे, राहुल खेडकर, एम.एम.बरे, प्रा.सारिका सावंत, श्रीमती सावित्री चिताडे, एन.आय.काळे, प्रा.रफिक शेख आदि उपस्थित होते.