शिवसेना शिंदे गटाचे रिपोर्ट कार्ड आलं, मंत्रीपदही जाणार?; लॉटरी कुणाकुणाला?

राज्यात महायुती सरकारची स्थापना झाली, त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आठवडाभरात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी बैठका, चर्चा आणि गाठीभेटींना वेग आला आहे. मंत्रीपदासाठी आता नेत्यांची चाचपणी सुरू आहे, महायुतीतील तिन्ही पक्ष आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं आहे.

मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचं तसंच इच्छुक आमदारांचं प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केले आहे. यात दोन माजी मंत्री नापास ठरले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे या नापास झाले आहेत. तर मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले पाच आमदार पास झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राठोड हे विदर्भातून येतात आणि सत्तार हे मराठवाड्यातून येत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यंदा तरी नंबर लागेल का?

भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. यातील काही नेत्यांनी आपली इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे. काही लोकांचा मागच्या टर्ममध्येच नंबरही लागणार होता. तर काही इच्छुकांच्या समर्थकांनी भावी मंत्री म्हणून त्यांच्या मतदारसंघात बॅनरही लावले आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाने केलेल्या पडताळणीत हे पाचही आमदार पास झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद देणार की वेगळा काही निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कसरत करावी लागणार

महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्रिपद मिळणार असल्याची माहीती. यापैकी 10 ते 12 मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार. त्यामुळे मंत्र्यांची वर्णी लावणं ही एकनाथ शिंदे यांची मोठी डोकेदुखी असणार आहे. कारण शिंदे यांच्या शिवसेनेकडे 60 आमदारांचं बळ आहे. त्यापैकी फक्त 10 ते 12 आमदारांनाच मंत्रिपद दिलं जाणार असल्याने आमदार निवडताना एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेने इच्छुकांचं प्रगतीपुस्तक काढलं असलं तरी ऐनवेळी काय होतं हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.

शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले संभाव्य मंत्री.

१) गुलाबराव पाटील

२) उदय सामंत

३) दादा भुसे

४) शंभूराजे देसाई

५) तानाजी सावंत

६) दीपक केसरकर

७) भरतशेठ गोगावले

८) संजय शिरसाट

९) प्रताप सरनाईक

१०) अर्जुन खोतकर

११) विजय शिवतारे

Comments (0)
Add Comment