सामाजिक बदलासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची-उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांचे प्रतिपादन

परभणी,दि 21 ः तंत्रज्ञान युगात आपण वावरत असताना ही आज समाजात अनेक समस्या आहेत. हुंडा पध्द्ती, कौटुंबिक हिंसा, बालविवाह सारख्या मूलभूत समस्या वाढत असताना युवकांनी अशा समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन सामाजिक बदलासाठी महत्वाची भूमिका निभवावी असे प्रतिपादन परभणीच्या बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी केले.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साडेगाव येथे सोमवार (दि.२१) रोजी विशेष वार्षिक शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या सह सरपंच शेषराव भांगे, ज्ञानेश्वर गायकवाड, विद्यासागर कांबळे, एच. आय. बेग आदींची उपस्थिती होती.
पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन व स्वच्छ भारत अभियान या विषयावर आयोजित शिबिरात मार्गदर्शन करताना विशाल जाधव पुढे म्हणाले, महाराष्ट्रात परभणी जिल्हा बालविवाहाच्या संदर्भात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यासाठी ही बाब लाजिरवाणी आहे. ह्या समस्येला कायमचे दूर करायचे असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाज जागृती करावी. जेंव्हा युवक हे काम हाती घेतली तेंव्हा नक्कीच ही समस्या दूर होईल असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वाची भूमिका पार पाडत विद्यार्थ्यांचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त करण्याचे काम ही करते. कुटुंब आणि समाजाप्रती उत्तरदायित्व निभावण्याचे कर्तव्य मनामध्ये रुजवण्यासाठी कार्य ही योजना करते असे मत अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी मांडले.सदरील कार्यक्रमात ज्ञानेश्वर गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छ. शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ.तुकाराम फिसफिसे, प्रस्ताविक डॉ.दिगंबर रोडे, तर आभार प्रदर्शन प्रा.विलास कुराडकर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाधिकरी प्रा.सविता कोकाटे, प्रा.राजेसाहेब रेंगे, प्रा.डॉ.जयंत बोबडे, डॉ.प्रल्हाद भोपे, प्रा.स्वाती देशमुख आदींसह मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment