विधिमंडळाचं विशेष अधिवेशन…तारीख ठरली !

महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी अखेर राज्यात नव्या सरकारची स्थापना झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंत्रालयात घडामोडींना वेग आला आहे. तीनही नेते मंत्रालयात पोहोचले आहेत. तीनही प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडत आहे. या बैठकीत नेमके कोणते मोठे निर्णय घेण्यात येतील? याबाबत उत्सुकता लागलेली असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकार स्थापनेनंतर आता पुढच्या दोन दिवसांनी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या 7 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना उद्या तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम जवळपास दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विशेष अधिवेशन दोन दिवस असण्याची शक्यता आहे. या विशेष अधिवेशनानंतर दोन आठवड्यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे.

 

Comments (0)
Add Comment