पुस्तकांवर प्रेम केल्यास जगणं समृद्ध होईल -सिनेकलावंत योगेश सिरसाट

परभणी,दि 11  मोबाईलच्या वाढत्या प्रभावाने विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहेत. यश, प्रसिद्धी तथा चांगले जीवन जगायचे असेल तर पुस्तकांवर प्रेम करायला शिका म्हणजे आपलं जगणं समृध्द होईल असे मनोगत चला हवा येऊ द्या फेम तथा सिनेकलावंत योगेश सिरसाट यांनी व्यक्त केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाचा बक्षीस आणि समारोपाचा कार्यक्रम शनिवार (ता.११) रोजी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य इंजि. नारायण चौधरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, उपप्राचार्य प्रा. नारायण राऊत, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, समन्वयक डॉ.प्रल्हाद भोपे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना योगेश सिरसाट म्हणाले, युवकांनी स्वतःसह कला, सृजनावर प्रेम करावे. इंटरनेटच्या माध्यमातून आभासी जगाचा कितीही विकास होत राहिला तरीही शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन मिळविता येणे शक्य नाही. काळानुरूप शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते दृढ होत जावे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करावा. महाराष्ट्रात शिवाजी महाविद्यालयात पहिले महाविद्यालय आहे ज्या महाविद्यालयास स्वतःचे गीत आहे असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी रिस्क, प्रेम नावाच्या कविता सादर करीत उपस्थितांचे मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे. पाठयक्रमोत्तर उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित व्हायला मदत होते. अशा उपक्रमातुनच अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर सुरू केले आहे. उपस्थित विद्यार्थ्यांनी ही आपल्या कलागुणांचा आविष्कार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्नेहसंमेलना दरम्यान घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, गीतगायन, रांगोळी, आनंद नगरी आदी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वर्षभरात एनएसएस, एनसीसी आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव ही करण्यात आला. तसेच परीक्षेत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रल्हाद भोपे, सूत्रसंचालन तसेच आभार प्रा. नितीन चौधरी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments (0)
Add Comment