केंद्राने कांदा निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. तर कांद्याच्या संभाव्य दरवाढीमुळे नागरीक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यातच आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या दरवाढीवरून ओरड करणाऱ्यांना तो न खाण्याचा सल्ला दिला आहे. ‘ज्याला कांदा परवडत नाही, त्यांनी 2-4 महिने कांदा खाल्ला नाही, तर काही बिघडत नाही, असे ते म्हणालेत.
कांदा निर्यात शुल्कात 40% वाढ
केंद्राने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. त्यांनी नाशिक भागात तीव्र आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी उपरोक्त वादग्रस्त विधान केले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाही, याची काळजी सरकार घेईल. शेतकऱ्यांना कांद्याचे दर कोसळण्याची भीती वाटत आहे. कांदे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या भावना केंद्राच्या कानावर घातल्या जातील. त्यावर केंद्र निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल.
योग्य ते नियोजन केले जाईल
दादा भुसे पुढे म्हणाले की, अनेकदा कांद्याला 200 ते 300 भाव मिळतो. काही वेळा तो 2 हजारांपर्यंतही जातो. त्यामुळे उत्पादन व पुरवठा याचे नियोजन करावे लागते. नाशिक जिल्ह्यातील हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे नियोजन या प्रकरणी केले जाईल.
…तर 2-4 महिने कांदे खाऊ नका
निर्यातीतील शुल्क दरवाढ नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याचा विचार घेऊन घेणे गरजेचे होते. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला, तर काहीच अडचण नाही. आपण 1 लाखांची गाडी वापरतो. त्यामुळे 10 – 20 रुपये जास्त देऊन 20 माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने 2-4 महिने कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही, असेही दादा भुसे यावेळी म्हणाले.
बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद
केंद्र सरकारने कांद्यावर अकस्मात निर्यात शुल्क लागू करताना स्पष्टता केली नसल्याने परदेशात जाणारा माल बांग्लादेश सीमा व बंदरात अडकून पडला आहे. या निषेधार्थ सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचे जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने जाहीर केले होते. त्याचे परिणाम पहिल्याच दिवशी घाऊक बाजारात दिसून आले. काहींना या निर्णयाची कल्पना नव्हती. त्यामुळे विंचूर उपबाजार आणि पिंपळगाव बसवंत येथे काही शेतकरी टेम्पोत कांदा घेऊन आले होते.
लिलावाअभावी त्यांना माल परत नेण्याची वेळ येऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी संबंधितांच्या मालाचे लिलाव केले. तथापि, हे प्रमाण अतिशय कमी होते. जिल्ह्यात सध्या दैनंदिन ६० ते ७० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. लिलावातून कोट्यवधींची उलाढाल होते. आवक व उलाढाल पूर्णत: थंडावली आहे. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजारात दैनंदिन १५ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन दीड ते दोन कोटींची उलाढाल असते. या समितीत शुकशुकाट होता. कुणी कांदे विक्रीसाठी आले नाही. विंचूर उपबाजारात १०८ वाहनांचे लिलाव झाल्याचे समितीकडून सांगण्यात आले. पिंपळगाव बाजारात सकाळी तसे लिलाव झाले. व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे नियमित लिलाव ठप्प झाले आहे.