परभणी,दि (२९) जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे एकमेव राजे आहेत ज्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या बळावर स्वकर्तृत्व सिद्ध करीत स्वराज्य निर्माण केले. त्यांना ही प्रेरणा आपली आई राजमाता जिजाऊ यांच्या संस्काराने मिळाली. जिजाऊंनी शिवरायांना दिलेले संस्कार आजच्या मातांनी मुलांमध्ये रुजविणे गरजेचे आहे असे मत प्रा. सुभाष ढगे यांनी बुधवारी (दि.२८) रोजी व्यक्त केले.
तालुक्यातील तारुगव्हाण येथे प्रजा सुराज्य सेवा संस्था आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सार्वजनिक शिवजयंती व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर पोहंडुळचे सरपंच माधवराव नाणेकर, प्रा.डॉ.जयंत बोबडे, संतोष शिंदे, सरपंच काशिनाथ गीते, शिवाजी वानखेडे,दादासाहेब पौळ, उद्धव सोनवणे, सतीश पौळ, विष्णू पौळ, मिराताई वानखेडे, संतोष वानखेडे उपस्थित होते. पुढे बोलताना श्री ढगे म्हणाले, राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि शिवरायांच्या माध्यमातून ते साकार केले.आजच्या मातांनी आपल्या पाल्यांना अधिकारी बनविण्याचे स्वप्न पाहून साकार करावे. जिजाऊंनी शिवरायांना माणुसकी, प्रेजेप्रति जिव्हाळा, स्वराज्य हेच आपले ध्येय, पर स्त्री मातेसमान हे संस्कार लहानपणीच दिले होते. त्याचाच परिपाक शिवाजी महाराज समकालीनच नाहीतर तदनंतर ही कित्येक राजांना आदर्शवादी ठरले.समाजातील प्रत्येक मुलीला जिजाऊ कळल्या पाहिजेत. शिवराय श्रध्दाळु होते पण अंधश्रद्धाळु नव्हते. साडेतीनशे वर्षांनंतर ही आज त्यांच्या कीर्तीचा डंका जगभर वाजत आहे. कारण त्यांचं कर्तृत्वच महान होते. जोपर्यंत सूर्य-चंद्र असेल तोपर्यंत राजांची यशोगाथा मानवाला दिशादर्शक असणार आहे यात काही शंका नाही. म्हणून शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श घेत लेकरांना घडविले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी गावातील बालकांनी शिवरायांविषयी विचार मांडले. जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. संस्थेच्या वतीने निराधार कुटुंबाला मदत ही करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वानखेडे, सूत्रसंचालन आणि आभार विष्णू पौळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचीन वानखेडे,भागवत पौळ, मारोती पौळ,अर्जून वानखेडे, रामभाऊ वानखेडे, हनुमान वानखेडे,ज्ञानोबा पौळ, राजेभाऊ पौळ,प्रल्हाद डाके आदींनी पुढाकार घेतला. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.