पूर्णा,ता 06 ः
कावलगाव वाडी (ता.पूर्णा) येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवून एका शेतकऱ्याला चार जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर हेडची मोडतोड करुन चाकातील हवा सोडून दिली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात चार जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कावलगाव वाडी येथील फिर्यादी शेतकरी प्रकाश किशनराव शेळके (वय ४२) हे त्यांचा पुतण्या बालाजी शेळके यांच्यासोबत ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक करत होते. धानोरा मोत्या गावाकडे जाणा-या रोडवर भवानी मातेच्या मंदिरा जवळ येताच गावातील भावकीचे दंडेलशाही करणारे रामदास एकनाथ शेळके, गिरधारी परसराम शेळके, नरहरी नागोराव शेळके, परसराम नागोराव शेळके यांनी संगनमत करुन फिर्यादी प्रकाश शेळके व त्यांचे पुतणे बालाजी शेळके यांना ट्रॅक्टरमधून खाली उतरवून शेतजमिनीबाबत कोर्टात चालू असलेला वाद मिटवून घे, नाहीतर तूला जिवेमारुन टाकतो, अशी धमकी देऊन लोखंडी रॉडने मारहाण केली.
या प्रकरणी शेतकरी प्रकाश शेळके यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलिस ठाण्यात रामदास शेळके, गिरधारी शेळके, नरहरी शेळके, परसराम शेळके यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.