सेलू / नारायण पाटील – शहरातील मध्यवस्तीत असलेल्या व सतत अत्यंत गजबलेला परिसर असलेल्या क्रांती चौक ते लोकमान्य टिळकांचा पुतळा या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढत असून याबाबत प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे .यामुळे सर्वसामान्य जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .
या रस्तावर अतिक्रमण व हातगाडे यांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे .पूर्वी पोलीस स्टेशन ला जाण्याचा हा रस्ता होता व पोलिसांची गाडी सतत या रस्त्यावरून ये जा करीत असल्यामुळे रस्ता मोकळा होता .परंतु सध्या पोलीस स्टेशनचे नवीन बांधकाम सुरू असल्यामुळे पोलीस स्टेशन तात्पुरत्या स्वरूपात गावाच्या बाहेर आहे .त्यामुळे ही कोंडी जास्त वाढत आहे .वाहन चालकांना येथून जातांना अपघात होतो की काय ही भीती मनात असते .तर कधी कधी अपघात होऊन वाद देखील होतात .पायी चालणाऱ्यांना तर कसरत करतच चालावे लागते .त्यात वृद्ध व महिलांना तर येथून जाणे जिकरीचे बनत आहे .रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी कांही दुकानदारांनी आपल्या आपल्या दुकानासमोर अतिक्रमण केले आहे .तसेच हात गाडे देखील या रस्त्यावर अगदी अस्ताव्यस्त पणे उभे केले जातात . एखादे चारचाकी वाहन आले तर पूर्णपणे रस्ताच बंद होतो .सणासुदीच्या काळात तर या भागाला अक्षरशः जत्रेचेच स्वरूप येते .बरेच मोटारसायकल चालक तर बाहेरच आपली वाहने उभी करून या भागात फिरतात .येथेच एक हनुमानाचे व सटवाईचे मंदिर असल्याने भाविक भक्तांना देखील दर्शनासाठी येतांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे .त्यामुळे प्रचंड नाराजी पसरत आहे .
तरी नगर परिषद प्रशासनानेच या रस्त्यावरील अतिक्रमण काढून व हातगाडे वाल्यानां शिस्त लावून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी .अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे .
या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि झालेले अतिक्रमण हे सर्व सेलूकर दररोज पाहतात,परंतु बोलायचे कुणी?उगाच कशाला भानगडीत पडायचे या विचाराने निमूटपणे माना खाली घालुन मिळेल तिकडून रस्ता शोधून घर गाठतात . परंतु बोलायचे कुणी? ना नगर परिषद प्रशासनाला देणेघेणे न लोकप्रतिनिधींना. परंतु नागरिकांनी जर तक्रार केली तर आम्ही कारवाई करू,परंतु आम्ही मनाने काही करणार नाही, अशी भावना प्रशासनाची दिसते.
परंतु या रस्त्याने वागणारे हजारो नागरिक,वृद्ध,महिला आपल्याच सेलू शहराच्या नागरिक आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
यामुळे क्रांती चौक ते लोकमान्य टिळक पुतळा या रस्त्यावर मोकळा श्वास घेता आला तर वृद्ध नागरिक,लहान मुले,महिला नक्कीच आशीर्वाद देतील आणि शहरात प्रशासन आहे हेही सर्वांना कळेल अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत .