9 अब्ज रुपयांचे व्यवहार..600 वीटभट्ट्या..सुरेश धसांनी तर सगळच काढल…

आपल्या मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला. परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर बँकेमध्ये 900 कोटींचे हस्तांतरण झाल्याचं दिसून येतंय आणि त्यामागे परळीचा ‘आका’ आहे असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. महादेव बेटिंग अॅप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल असा आरोपही त्यांनी केला. यासंबंधित सर्व कागदपत्रे ही पोलिस अधीक्षकांना दिले असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं.

आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. त्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, परळीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे बँक व्यवहार झाले आहेत. दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावरही तसेच व्यवहार झाले आहेत. यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे? परळीत दोन लोकांकडे मोठं घबाड आहे. अजून असे किती लोक असतील याची माहिती घेतली पाहिजे.

महादेव अॅपच्या माध्यमातून परळीतील लोकांनी अब्जावधी पैसे कमावले असून त्यांच्यामागे त्यांचा ‘आका’ आहे. महादेव अॅपचा तपास केला असता त्याची लिंक ही परळीतून मलेशियापर्यंत पोहोचेल असं सुरेश धस म्हणाले. याच्या मागे सुद्धा ‘आका’ आहे . बीडमधील कोणतंही प्रकरण घ्या, त्याच्यामागे एकच ‘आका’ आहे.

यावेळी सुरेश धस यांनी पुन्हा एकदा ‘आका’चा उल्लेख केला. बीडमधील ‘आका’च्या बगलबच्च्यांनी जिल्ह्यातील तब्बल 1400 एक गायरान जमिनीवर ताबा मिळवला आहे. शिरसाळा गावात गायरान जमिनींवर 600 वीटभट्ट्या आहेत. यापैकी 300 वीटभट्ट्या अनधिकृत आहेत. या वीटभट्ट्या ‘आका’च्या कार्यकर्त्यांच्या आहेत, असा आरोप सुरेश धस यांनी केला. ‘आका’चे कार्यकर्ते येथून काही अंतरावर असलेल्या 50 ते 60 एकर जमिनीवरील मुरुम काढून आणतता आणि दुसऱ्या जमिनीवर टाकतात. रसाळ आडनावाचा माणूस हे काम करतो. आकांनी या भागात 50 एकर जमीन घेतली आहे, पूर्ण बोगदा बुजवला आहे. गोरगरीब म्हणतात आमच्या जमिनीतून मुरून नेऊ नका. पण तरीसुद्धा गँग्ज ऑफ वासेपुरने जबरदस्तीने फिलिंग केले आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला.

बीडमधील व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे व्यवहार

, मलेशिया कनेक्शन: सुरेश धस

सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव बेटिंग अॅप प्रकरणात गुंतलेल्या बीडमधील एका व्यक्तीचा उल्लेख केला. हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात दोन अधिकारी होते. या व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. 100 कोटी रुपयांच्या पुढे आर्थिक गैरव्यवहार असल्यास ईडीकडून तपास केला जातो. पण 9 अब्ज रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी तुम्ही कोणती यंत्रणा आणणार? महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात जो घोटाळा झाला त्यामध्ये चांगले पोलीस अधिकारी बाहेर काढले गेले. निष्क्रिय आणि आम्ही सांगू तेच करतील, अशा अधिकाऱ्यांना ठेवण्यात आले. या अधिकाऱ्यांनी या घटनेतील आरोपींना जामीन करुन देणं, त्यांना सहकार्य करणं, असे प्रकार घडले. त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

Comments (0)
Add Comment