तुका म्हणे : २५ : जाणीवपूर्वक प्रयत्न ते स्वहित

  • परभणी-गांधी विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले, जर सर्व गोष्टी तुम्हास अगदी विनासायास पलंगावर मिळाल्या तर कसे वाटेल ? सर्व विद्यार्थी खूष होऊन म्हणाले “एकदम मज्जाच !” एक विद्यार्थी मात्र गंभीरपणे म्हणाला, सुरुवातीस थोडे बरे वाटेल मात्र हळूहळू त्याचा कंटाळा येऊन आळस यायला लागेल व त्याची सवय जडून कदाचित आम्ही अकार्यक्षम बनू . प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या वक्त्यांनी याबाबत सविस्तरपणे सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, कोणतेही कार्य विनासायास होतच नसते कार्यसिद्धीस आवश्यक असते प्रयत्नांची. हे तुकाराम महाराजांनी खूप छान सांगून ठेवले आहे. ते असे,

तुका म्हणे

मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥
याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥
उदक अन्न काये म्हणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥
व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥
तुका म्हणे जया आपुलें स्वहित। करणें तोचि प्रीत धरी कथे ॥४॥तुकाराम महाराज म्हणतात मुंगीच्या घरी जाऊन कोणी मुंगीला बोलावणे पाठवले आहे काय केवळ गुळ पाहिला ती लगेच त्याच्यावर धाव घालते. याचकावाचुन दात्याचे काही खोळंबलेले असते काय परंतु आपले हित व्हावे यासाठीच याचक दात्याकडे धाव घेत असतो. पाणी आणि अन्न कधी कोणाला म्हणते का मला खा किंवा प्या तर नाही ज्याला भूक लागलेली असते तो त्याच्याकडे आवडीनुसार जात असतो. व्याधीने पीडित असलेला मनुष्य आपल्या दुःखाचा परिहार व्हावा यासाठी स्वतःहूनच वैद्याच्या घरी जात असतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आपले स्वहित करायचे आहे तो स्वतःहूनच चांगल्या गोष्टींवर (हरी कथेवर) प्रेम करायला शिकतो.

आपण नेहमी म्हणत असतो ही गोष्ट अशी झाली असती तर खूप बरं झालं असतं परंतु ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी बऱ्याच वेळा आपण काहीच प्रयत्न करत नाही. आपल्याकडे आपण नेहमी म्हणतो, ” दे रे हरी आणि पलंगावरी”. परंतु असे कधीच होत नसते. प्रत्येक कार्यसिद्धीसाठी आवश्यक असते ते जाणीवपूर्वक प्रयत्नांची.

जाणीवपूर्वक प्रयत्न ते स्वहित :

*१) शोध गरजेचा :* गरज ही शोधाची जननी आहे असे आपण म्हणतो. आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी अनेक गोष्टींची गरज भासत असते. आदिमकालखंडामध्ये अग्नी वणव्यापासून लागतो व त्याचा अनेक कामांमध्ये मनुष्यास उपयोग होतो हे जाणल्यानंतर मनुष्यास अग्नी तयार करण्याची गरज भासली. त्यातून मनुष्याने लाकडास लाकूड घासून अग्नी तयार केला. परंतु हा अग्नी मिळवण्यासाठी त्यास करावे लागले ते जाणीवपूर्वक प्रयत्न. म्हणूनच तुकाराम महाराज एका ओवीमध्ये म्हणतात, *”अग्नी काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥”* म्हणजेच काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु त्याचे मंथन केल्यावाचून घर्षण केल्यावाचून अग्नी लाकडाला लागणार नाही.

२) इच्छा तेथे मार्ग : बऱ्याच वेळा कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण मला हे जमणार नाही असे म्हणून करतो. म्हणजेच कार्य करण्यासाठी स्व:इच्छेची कमतरता अशा ठिकाणी जाणवते. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अवघड वाटणाऱ्या गोष्टीनाही अनेक मार्ग शोधण्यासाठी मदत होते आणि एखादी गोष्ट करायचीच नाही म्हटले तर त्यासाठी हजारो कारणे सापडतात. त्यामुळेच कार्यसिद्धीसाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे अत्यावश्यक असते.

३) सुरुवात प्रयत्नांची :कोणतेही कार्य आपोआप होतच नसते. त्यासाठी आवश्यकता असते प्रयत्नांची. आळसापोटी आपण कामाची सुरुवातच करणेच टाळतो व त्यातून अनेक तोटे सहन करावे लागतात. म्हणूनच कोणत्याही कार्याची फलसिद्धी मिळवण्यासाठी त्या कामाची लवकर सुरुवात करणे अत्यावश्यक असते. म्हणूनच कोणतेही काम आपोआप होईल किंवा कोणी इतर करेल अशी भाबडी अपेक्षा न ठेवता त्या कामास तत्परतेने सुरुवात करणे हेच स्व:हित जपण्याचे वर्म होय. म्हणूनच तुकाराम महाराज एका ओवीत म्हणतात, *”अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तोचि तापे जाउनियां ॥१॥ उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥”* तुकोबाराय म्हणतात अग्नी मुद्दामून कोणाला जवळ बोलावत नाही पण ज्याला थंडी वाजली असेल तोच अग्नीजवळ जातो. पाणी कधी म्हणते काय या मला प्या तर नाही ज्याला तहान लागली असेल तोच पाणी पिण्यासाठी पाण्याकडे धावत जातो.

४) आळस दूर करणे : कोणत्याही कार्यसिद्धीस मारक ठरतो तो आळस. कोणतेहे कार्य पूर्णत्वास न्यायचे असेल तर आपणास आळस दूर ठेवावा लागतो.

५) स्वहित जाना , परहित जपा : स्वहित करणे म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करणे असे नव्हे तर इतरांच्याही हिताची जोपासना करणे. म्हणूनच स्वहित साधतांना इतरांच्या भावनिक, भौतिक, सामजिक बाबींना ठेच लागू नये याचीही काळजी घ्यावी. त्यासच आपण म्हणतो स्वहित जपा, परहीत जाणा. स्वहिताचा परीघ वाढवत नेऊन स्व:पासून स्व:कीय , स्व:समाज ते स्व:देश असा परीघ वाढवण्याचा प्रयत्न करावा.तुकाराम महाराज आपल्या अनेक ओव्यांमधून स्वतःचा विकास साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांना महत्त्व देताना दिसतात. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात

तुका म्हणे जया आपुलें स्वहित। करणें तोचि प्रीत धरी कथे ॥

डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मनोविकारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल,
परभणी ९४२२१०९२००

डॉ.जगदीश नाईकतुका म्हणे भाग 25परभणीमन हॉस्पिटल परभणी
Comments (0)
Add Comment