रात्रीचे अकरा वाजले होते. साखरे साहेबांचा अचानकपणे आवाज आला, सर खाली साप निघाला आहे, त्या कोपऱ्यात फटीत लपून बसलाय. खाली जाऊन पाहिले तर शेपटीचा अर्धवट भाग दिसत होता काळसर पट्ट्या पट्ट्याचा हातभर लांबीचा तो साप फटीत दडून बसला होता. कोणीतरी म्हणाले काठी आणा मारू सापाला. तेवढ्यात आठवण आली रणजित दादांची , त्यांना फोन केला असता दहा मिनिांपेक्षा कमी वेळात ते घरी आले. त्यांनी सापाला व्यवस्थित पाहिले व फटीत हाथ घालून सापाला पकडले. साप इतक्या सहज न भिता पकडणे म्हणजे सर्वांना धक्काच बसला. या मागचे रहस्य विचारल्यास ते म्हणाले जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक सराव …बाजूलाच एक आजोबा उभे होते , ते म्हणाले त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात
तुका म्हणे
साधुनी बचनाग खाती तोळा तोळा ! आनिकाते डोळा न पाहावे !!१!!
साधुनी भुजंग धरितील हाती ! आणिके कापती देखोनिया !!२!!
असाध्य ते साध्य करिता सायास ! कारण अभ्यास तुका म्हणे !!३!!
तुकोबाराय म्हणतात, काही लोक सरावपूर्वक सर्पविष खाण्याची कला करतात, इतरांना ते पाहावत देखील नाही. काही लोक सर्प पकडण्याचे जाणून हातात सर्प पकडतात, इतर लोक मात्र ते पाहून भयाने कापतात. तुकाराम महाराज म्हणतात, जगात जे अशक्य आहे ते प्रयत्नपूर्वक साध्य करणारेही लोक असतात.
मग प्रश्न पडतो अशक्य गोष्ट साध्य करणे म्हणजे काय व ती कशी करावी?
१) वास्तववादी व तथ्य ध्येय : (fact and real goals) :
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे हा अतिशयोक्ती अलंकारातील पद्य. यास खरे म्हणून वाळूचे कण रगडीत बसल्याने तेल कधीच निघणार नाही. म्हणजे आपले कार्य ठरवताना आपण ते कार्य विवेकी दृष्टीकोनातुन हडसुन- खडसून पहावे. कोणतेही कार्य करताना त्या कार्याबाबत आपल्या आवाक्यातील गोष्टी व आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टींचा विवेकी दृष्टिकोनातून विचार करावा. प्रत्येक गोष्ट मला जमलीच पाहिजे हा “च” अट्टाहास टाळावा.
२) आनंदासाठी कार्य : (process satisfaction) : रणजीत दादांना साप पकडल्याने काय मिळते ? असे विचारल्यास ते म्हणाले, इतरांना भयमुक्त केल्याचा आनंद, सापाचा जीव वाचवल्याचा आनंद व या कृतीतून माझा स्वतःचा आनंद. म्हणजेच कोणतीही कृती करताना त्या कृतीच्या प्रोसेसचा आनंद व ती कृती पूर्ण झाल्याचा म्हणजेच यंड गोल (End goal) सॅटिसफॅक्शन असे दोन प्रकारचे कृतीतून समाधान मिळते. कोणतीही कृती करताना प्रोसेसमधील समाधान मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्या प्रोसेसमधील मरगळ दूर होऊन आनंद प्राप्त व्हायला लागतो व कृती सुलभ होते. कधीकधी आपण कर्तव्याचा अर्थ असा लावतो की त्याचे ओझे व्हावे. करायलाच हवे म्हणून काही कृती करतो ,तर कधी तक्रारखोरपणे ड्युटी बजावतो. कर्तव्यभावनेत सक्ती म्हणजेच कंपल्शन आले की त्यातला आनंद संपला.
३) चुकांमधून सुधारणा: कोणतीही कृती करत असताना सुरुवातीच्या काळात आपल्या चुका होतच असतात. काही मंडळी मला जमणारच नाही ,हे खूप अवघड आहे असे म्हणून ती कृती सोडून देतात तर बाकी मंडळी चुकांमधील बारकावे शोधत त्या दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्यक्षात आपण एक स्खलनशील मानव आहोत. त्यामुळे आपण काही चुका करणारच. म्हणूनच त्या सुधारण्याचा प्रयत्न ही आपण करु शकतो. एखादी चूक घडल्यास विवेकी दृष्टिकोनातून मी फक्त ही चूक केली आहे असे समजावे , संपूर्ण व्यक्तिमत्वाला आपण चुकीचा पुतळा आहोत असा ठसा मारू नये. म्हणजेच कृती करताना हवा तो संयम व निग्रह.
४) प्रयत्नपूर्वक सराव : कृतीमधील चुकांमध्ये सुधारणा करून झाल्यानंतर आपणास करावा लागतो तो जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक सराव. कोणत्याही गोष्टीचा परफेक्शनिझम कडे वाटचाल करायची असेल तर सरावाची अत्यंत आवश्यकता असते. सराव म्हणजे सातत्यपूर्ण, जाणीवपूर्वक ,नवीन गोष्टी शिकण्याच्या विवेकी दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न. पहा ना एखादे चाळीस वर्ष डॉक्टरकी करणारे डॉक्टर मी अजून प्रॅक्टिस करतोय असेच म्हणतात. सराव करताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चूका सुधारण्यावर बरोबरच नवीन चुका न होऊ देण्याचा प्रयत्न.
५) परफेक्टकडे वाटचाल (Excellence) :
सचिन तेंडुलकर ला गॉड ऑफ क्रिकेट असे संबोधले जाते त्यास आपण परफेक्ट क्रिकेटर असे म्हणतो. परंतु सचिनचा इंटरव्यू ऐकताना असे कळते की तो नेहमी म्हणत असतो, मी माझ्याकडून एक्सलंट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुढील वेळी खूप सराव करून अजुन चांगला खेळ करेल . आपण सराव करत प्रयत्नांनी परफेक्टकडे वाटचाल करू शकतो, परंतु कोणतीही कृती १००% परफेक्ट व्हावीच हा अट्टाहास आपणास त्रासदायक ठरू शकतो. मला तर असे वाटते की जगात शाश्वत परफेक्ट असे काही नसतेच कारण जगात प्रत्येक गोष्ट क्षणा-क्षणाला बदलणारी आहे.
६) अभ्यासाचा निग्रह :
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही कृती किंवा त्याचा सराव (अभ्यास) करण्यासाठी त्या व्यक्तीची मनापासून असलेली तयारी म्हणजेच त्या व्यक्तीचा त्या कृती बाबतचा निग्रह. कोणत्याही असाध्य वाटणार्या गोष्टीबाबत कृती करण्याची सुरवात म्हणजे ती कृती करण्याचा ठाम निर्णय. मग I am ” impossible ” म्हणणारी कृतीच ” I M Possible ” म्हणायला लागते.
म्हणूनच त्या रात्री रणजीत दादांनी सहजरीत्या साप पकडण्याच्या कृतीमागील गणित म्हणजे त्यांनी सर्पमित्र म्हणून केलेला जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक अभ्यास. त्यांना सरावातून कळलेल्या गोष्टी म्हणजेच विषारी-बिनविषारी साप, सापास कुठे पकडल्यास चावणार नाही, त्याचा नैसर्गिक निवास ई..
म्हणूनच तुकोबाराय म्हणतात
असाध्य ते साध्य करिता सायास ! कारण अभ्यास तुका म्हणे !!
डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
(मानसोपारतज्ज्ञ)
मन हॉस्पिटल, परभणी
९४२२१०९२००