दहावीतील एका हुशार विद्यार्थ्यांचा निकाल नापास असा लागला. निकाल पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या शिक्षकांनी त्यास अगदी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर त्याने सांगितले, निबंधाचा विषय सविस्तरपणे मांडत असताना वेळेचे भान न ठेवल्यामुळे इतर प्रश्नांची उत्तरे लिहीण्यास वेळ कमी पडला. त्यामुळे त्यास नापास व्हावे लागले. त्यावेळी शिक्षक त्यास म्हणाले वेळेचे व श्रमाचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असते हे तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितले आहे ते असे,
तुका म्हणे ,
शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥
ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥
सांभाळावें वर्म । उचिताच्या काळें धर्म ॥२॥
तुका म्हणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, अन्न चांगले शिजले आणि तरीही खाली जाळ चालू ठेवला तर चांगले अन्न वाया जाण्यासाठी हे मुख्य कारण ठरते. त्यामुळे निरर्थक श्रम टाळावे, असे श्रम व्यर्थ ठरते. योग्य वेळी योग्य काय आहे ते कळाले पाहिजे व ते सांभाळले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही कार्य करत असताना या गोष्टी समजत असतात किंवा समजून घ्याव्या लागतात.
यश हे ज्ञान , बुद्धिमत्ता , प्रयत्न , सातत्य , चीकाटी, उपलब्ध सुविधा, संपत्ती अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. या सर्व बाबीव्यतिरिक्त यश संपादनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळेचे व श्रमाचे व्यवस्थापन.. गमावलेली संपत्ती कष्टाने परत मिळवता येते, अज्ञान अभ्यासाने दूर करता येते , बिघडलेले स्वास्थ्य औषधाने सुधारू शकतो, परंतु एकदा गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. कोणती गोष्ट केव्हा, कशी, कोणाबरोबर, कधी, कुठे करायची या बाबींच्या व्यवस्थापनामुळे यशास गवसणी घालने अगदी सोपे होते.
वेळेचे व श्रमाचे व्यवस्थापन कसे करावे ?
वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे इतिहासात पहावयास मिळते ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक कृतीतून.. त्यांचेच उदाहरण म्हणजे पन्हाळ्याला सिद्धी जोहरने दिलेल्या वेढ्या वेळेस महाराजांनी काही महिन्यांच्या वेढ्यानंतरही सिद्धी जोहर माघार घेण्यास तयार नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी योग्य वेळेचे व्यवस्थापन आखले. त्यानुसार महाराजांनी गडावरून केव्हा, कसे, कोणासोबत , कधी निघायचे याची पूर्वतयारी केली आणि सिद्धीस मात दिली.
१) केंव्हा ? : कोणत्याही कार्याची सुरुवात केंव्हा करायची या बाबीवर त्या कार्याची कार्यसिद्धी अवलंबून असते. कारण आपण नेहमी म्हणतो ” वेल बिगिन इज हाफ डन “. परंतु ही सुरुवात केव्हा करायची हे अत्यंत महत्त्वाचे असते . ज्यावेळी उतावीळपणे आपण एखादी गोष्ट पटकन , पूर्वनियोजन नसताना करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अपयश येण्याची शक्यता जास्त असते. तसेच कृती करण्यास खूप उशीर केल्यासही अनेक बाबी हाताबाहेर गेल्यामुळे अपयश येऊ शकते. कामाची सुरुवात केव्हा करायची हे ठरवण्यासाठी आपण आपल्याकडील उपलब्ध सुविधा, आजूबाजूची सध्या परिस्थिती, आपल्या प्रबळ बाजू व कमतरता ई गोष्टींचा आढावा घेणे आवश्यक असते.
२) किती वेळात ? : कृती करत असताना बऱ्याच वेळा एकाच वेळी अनेक कामे करण्याचे आव्हान आपणासमोर असते. अशावेळी कोणते काम पहिले व किती वेळात याची वर्गवारी करणे अत्यावश्यक असते. जसे काही कामे अतिमहत्वाचे व त्वरित करायची असतात जी आपल्या ध्येयानुसार सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत व त्याचबरोबर ती त्वरित करणे आवश्यक असतात अशा कामांना प्राधान्य देणे आवश्यक ठरते. तसेच प्रत्येक कामास किती वेळ द्यायचा व त्यावर किती श्रम करायचे ही पण एक महत्वाची बाब आहे. जसे तुकाराम महाराज वरील ओविमध्ये म्हणतात, अन्न चांगले शिजल्यावर देखील जाळ चालू ठेवल्यास ते अन्न खराब होते व अन्न आणि आपले श्रम वाया जातात.
३) कोणत्या पद्धतीने ? : काम करत असताना कोणत्या पद्धतीने त्याचे नियोजन केले आहे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब. त्यामध्ये वेळेचे, श्रमाचे नियोजन करणे आवश्यक ठरते. जसे भाजी करत असताना मिठाची योग्य मात्राच भाजी चवदार बनवते, मीठ कमी पडल्यास आळणी तर जास्त पडल्यास खारटपणा येतो व भाजी वाया जाते. कोणत्याही कृतीपूर्वी किंवा कृती करत असते वेळेस आपल्याकडे एक स्वतःची नियमावली असावी, जर ती नसेल तर आपल्याला दुसऱ्यांच्या नियमावलीवर अवलंबून राहावे लागते.
४) आपला दृष्टिकोन ? : प्रत्येकाला दिवसात कामासाठी २४ तास मिळतात. परंतु त्याचा उपयोग प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतो तो म्हणजे त्याच्या वेळेकडे , आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनानुसार..सर्वात मोठा फरक जो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये असतो तो म्हणजे त्यांच्या वेळेकडे बघण्याचा दृष्टिकोनात. याच विवेकी दृष्टिकोनाचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.. ज्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये स्वराज्याची उभारणी केली.
५) कृतीच्या परिणामांची पूर्वतयारी : कामाच्या सुरुवातीसच त्या कामांच्या परिणामांचा एक आढावा घेणे आवश्यक असते. कृती करणे हे जरी आपल्या हातात असले तरीही त्याचे यश-अपयश, लागणारा वेळ, श्रम पूर्णतः आपल्या हातात नसते. एखाद्या गोष्टीबाबत कार्य सुरू असताना आपणास त्या गोष्टीचे योग्य परिणाम येणार नाहीत असे वाटल्यास त्याचीही पूर्वतयारी करून ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या मनाची अस्वस्थता होणार नाही व आपण इतर मार्ग शोधण्यास सफल होऊ. त्यामुळे कृतींच्या परिणामांची पूर्वतयारी करणे तेवढेच आवश्यक.
बऱ्याच वेळा आपण वेळ व श्रम निरर्थक ठिकाणी वाया घालतो. त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात, योग्य वेळी योग्य काय आहे ते कळले पाहिजे व ते सांभाळले पाहिजे त्यातूनच आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर होऊ शकतो. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,
शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ !!
डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मानसोपारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल,
परभणी ९४२२१०९२००