“आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सर्वसमावेशक आणि कल्पक असा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सातत्याचा विश्वास असून हा अर्थसंकल्प युवक, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तभांचे सबलीकरण करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प २०४७ मधील विकसित भारताचा पाया रचण्याची हमी देतो. एक चांगला अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दिली.
सामान्य माणसाच्या डोक्यावरील तलवार हटवली
“आजच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकर सूट योजनेची (Income tax remission scheme) घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे मध्यमवर्गातील एक कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे. आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी टांगती तलवार ठेवली होती. ती आम्ही बाजूला केली. आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नॅनो डीएपीचा उपयोग, नव्या पशू योजना, पीएम मत्स संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर तेलबिया अभियान अशा योजनांचा समावेश यात आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच शिवाय खर्चही कमी होईल”, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक अर्थसंकल्पाच्या शुभेच्छा देशातील सर्व नागरिकांना दिल्या.
अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय
या अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संशोधनावर १ लाख कोटींचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअप्सला मिळणाऱ्या करसूटीचा विस्तार करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. वित्तीय तुटीला नियंत्रणात ठेवतानाच भांडवली खर्चाला ११ लाख ११ हजार १११ कोटींपर्यंतच्या ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवण्यात आलं आहे. अर्थतज्ज्ञांच्या भाषेत सांगायचं तर हा एकप्रकारे स्वीट स्पॉट आहे. यामुळे भारतात २१व्या शतकासाठी आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच युवकांसाठी अगणित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “अर्थसंकल्पात वंदे भारत रेल्वेच्या दर्जाच्या ४० हजार आधुनिक कोचेसची निर्मिती करून ते सामान्य प्रवासी रेल्वेमध्ये जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कोट्यवधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. आम्ही एक मोठं ध्येय ठरवतो, ते पूर्ण करतो आणि त्यानंतर त्याहून मोठं ध्येय ठरवतो.”
“गरिबांसाठी आम्ही गाव आणि शहरांमध्ये चार कोटीहून अधिक घरं निर्माण केली. आता आम्ही दोन आणखी घरं बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही दोन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं ध्येय ठरवलं होतं. आता हे ध्येय वाढवून तीन कोटींपर्यंत वाढवलं आहे. आयुष्मान भारत योजनेनं गरिबांना मोठी मदत केली आहे. आता अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना याची मदत होईल. गरीब वर्गाची उत्पन्नाची साधने वाढवण्यावर जोर देण्यात आला आहे”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.