पाणीटंचाई निवारणार्थ तातडीने उपाययोजना करा- आ.डॉ.गुट्टे यांची सूचना

 (प्रतिनिधी):-
शहरासह तालुक्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पूर्णा तहसील कार्यालय येथे पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आ.डॉ.गुट्टे यांनी पूर्णा शहरासह तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ग्रामीण भागातून आलेल्या सरपंचांनी यावेळी टंचाई विषयी आपल्या अडचणी मांडल्या. तहसीलदार माधव बोथीकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. येणाऱ्या काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्याने पुरेसे नियोजन करण्यात यावे, आवश्यक तिथे टँकर, विहिरींचे अधिगृहण करावे, अशा सूचना यावेळी आ.डॉ.गुट्टे यांनी केल्या.

या बैठकीत उपलब्ध पाणी साठा, मनुष्यबळ आणि गावनिहाय पाणी स्त्रोत यावर सुध्दा धोरणात्मक विचार करण्यात आला. तसेच नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत उपस्थितांची मत-मतांतरे जाणून घेतली.

मतदारसंघाच्या अनेक भागात आताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पुढे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. म्हणून संभाव्य धोका लक्षात घेत कडक पावले उचला, असेही आ.डॉ.गुट्टे म्हणाले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार माधव बोथे, गटविकास अधिकारी मयुर अंदेलवाड, तालुका अध्यक्ष गणेश कदम, प्रभारी सुभाष देसाई, नंदकुमार डाखोरे, रासप तालुका अध्यक्ष जगन्नाथ रेनगडे, बापूराव घाटोळ मामा, उत्तमराव ढोणे, नारायणराव पिसाळ, मिडीया प्रमुख दत्तराव पौळ, सरपंच नवनाथ भुसारे, विकास घाते, मारोती मोहिते, शिवाजी आवरगंड, इस्माईल शेख यांच्यासह पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, नगरपरिषदचे सर्व कर्मचारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment