पुणे- मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.
आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.दरम्यान, अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी त्यांचा ७७ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली . विक्रम यांनी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमा ही तीनही माध्यमं गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला. ‘बॅरिस्टर’ नाटकाने विक्रम यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. जवळपास ८ वर्ष त्यांनी हे नाटक केलं. परखड व्यक्तिमत्त्वासाठी गोखले विशेष ओळखले जायचे.