पत्रकारांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाची स्थापना-विजय चोरडिया

सेलू / नारायण पाटील – पत्रकारांसाठी पेन्शन ,आरोग्य ,घर ,पाल्यासाठी शिक्षण व तंत्रज्ञान माहिती या पंचसूत्री चा उपयोग करून पत्रकारांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली असून राज्यभर असंख्य सदस्य या संघटनेत सहभागी होत आहेत . पत्रकारांच्या सुखदुःखात देखील मदत करून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न या संघटनेमार्फत केला जातो .अशी माहिती या संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी सेलू येथील बैठकीत बोलतांना दिली.

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या सेलू तालुका नवीन कार्यकारिणीच्या निवडी संदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख ,व्हिजन इंग्लिश स्कुलचे संचालक संतोष कुलकर्णी ,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी सेलू तालुका संघटनेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .

 

यावेळी सर्वानुमते व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची सेलू तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली .यामध्ये अध्यक्षपदी श्रीपाद कुलकर्णी तर उपाध्यक्ष पदी मोहन बोराडे व विलास शिंदे यांची निवड करण्यात आली .तसेच सचिव पदी शिवाजी आकात तर सहसचिव पदी बालाजी सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली .कार्याध्यक्ष पदी बाबासाहेब हेलसकर तर कोष्याध्यक्ष पदी संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली .इतर पदाधिकारी व सदस्यांची देखील यामध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली .

 

अध्यक्षीय समारोपात गजानन देशमुख यांनी संघटनेच्या कार्याची सविस्तर पणे ओळख करून दिली .पत्रकारांच्या हक्कासाठी सदैव झटत असणारी ही संघटना असून विधानसभेत देखील या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवण्यात आला आहे .पत्रकारांना अधिस्वीकृती ,पेन्शन तसेच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील असून प्रत्येक पत्रकाराला आयुष्यमान भारत चे कार्ड मिळवून दिले जाणार आहे .या माध्यमातून त्यांचा व कुटूंबियाचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे .असेही त्यांनी यावेळी सांगितले .

 

भविष्यात सेलू तालुक्यात संघटनेचे सदस्य वाढीसाठी तसेच विधायक कार्य हाती घेऊन संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेतले जातील . असे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी मनोगतात स्पष्ट केले .
या बैठकीचे सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. बैठकीचे प्रास्ताविक मोहन बोराडे यांनी केले.

Comments (0)
Add Comment