सावधान ‘जवाद चक्रीवादळ’ येतेय…महाराष्ट्रावर देखील परिणाम होणार

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि भारताच्या पूर्व किनापट्टीवर झपाट्याने वातावरणात बदल होतं आहेत. सध्या बंगालच्या उपसागर  परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा  सक्रीय झाला असून याचं रुपांतर जवाद चक्रीवादळात होतं आहे. ‘जवाद चक्रीवादळ’ रविवारी ओडीशा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरदेखील जाणवणार असून अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘जवाद’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेशातील उत्तर किनारपट्टीवरील श्रीकाकुलम, विजयनगरम आणि विशाखापट्टणम या जिल्ह्यांना बसणार आहे. याशिवाय ओडिशातील गजपती, गंजाम, पुरी, नयागड, खुर्दा, कटक, जगतसिंगपूर आणि केंद्रपाडा या जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जवाद चक्रीवादळामुळे आज आंध्र प्रदेश ते ओडिशा दरम्यानच्या अनेक भागांना इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, जवाद चक्रीवादळ आज उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. हे वादळ ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकणार आहे. तर 5 डिसेंबरला म्हणजे रविवारी दुपारपर्यंत हे वादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

परिणामी आजपासूनच उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि ओडिशा किनारपट्टीजवळ ताशी 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपासूनच वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हे वारे पुढील 12 तास सुरू राहू शकतात, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा उसळणार असल्याची शक्यता असून 110 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सौदी अरब देशाने या चक्रीवादळाला ‘जवाद’ नाव दिलं आहे.

 

Comments (0)
Add Comment