सेलू / नारायण पाटील – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या थकीत १ कोटी २ लाख ९१ हजार ५०० रुपयांच्या वसुलीसाठी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सेलु शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला कुलूप ठोकून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.उर्वरित रक्कम अदा करेपर्यंत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता बी.डी. मार्गे यांनी मंगळवार ११ मार्च रोजी दिली आहे.
याबाबतची माहिती याप्रमाणे असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या थकीत पाणीपट्टीमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी १ कोटी ४४लाख ६११रूपये तर स्थानिक उपकर २ लाख ४६हजार ८९०रूपये असे एकूण १ कोटी २लाख ९१ हजार ५०० रुपयांच्या वसुलीची नोटीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी युवराज पोळ यांना जावक क्रमांक ४७९ नुसार ५मार्च २०२५ रोजी देण्यात आली होती. यापैकी एकूण रकमे पैकी १० लाख रुपये अर्थात १० टक्के रक्कमेचा भरणा सेलू नगरपालिकेकडून ८ मार्च रोजी करण्यात आला होता. उर्वरित रकमेसाठी १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला टाळे ठोकून सेलुचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. निम्न दुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.बी. कोरके यांच्या आदेशावरून उपअभियंता एच.एस.धुळगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता बि.डी. मार्गे यांनी ही कार्यवाही केली आहे. यावेळी एस. यु. शेख, ए.टी. कोल्हे, एस. एस. पठाण, कृष्णा देऊळगावकर आदीजणांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली आहे.