जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी इगतपुरी येथील सभेतून आज पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आता जे व्हायचं ते होऊ द्या, खेटायच ठरवलय तर खेटायचचं. पण, या सगळ्या टोळीच्या लक्षात आलं की, मराठा ओबीसीच्या आरक्षणात गेला आहे. त्यामुळे दंगली करायच्या यांचा कट असू शकतो, पण आपल्याला संयम ठेवायचं आहे. यांचा कट यशस्वी करू द्यायचा नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत शांतता ठेवायची असल्याचे जरांगे म्हणाले.
जालन्यातील आंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य करत टीका केली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटीलदेखील भुजबळांवर टीका करू लागले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे मोठी सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत आणि एकेरी उल्लेख करत म्हणाले की, तू कुठे भाजी विकत होतास, कोणाचं काय करत होतास, मुंबईत काय-काय केलं, कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलं याची मला माहिती आहे. तू कोणाचा बंगला बळकावला हेदेखील मला माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तू महाराष्ट्रातल्या जनतेचं खाल्लंस, महाराष्ट्र सदनाचा पैसा खाल्ला, महाराष्ट्रात सदनाचा पैसा हा महाराष्ट्रातील जनतेचा होता, तो पैसा तू खाल्लास, त्यामुळे तुला जनतेचा, गोरगरिबांचा तळतळाट लागला. म्हणूनच तू तुरुंगात गेलास. तिथं बेसण-भाकरी खाल्ली. आता म्हणतो तिथे कांदाही मिळत होता. मग अजून कांदा खा. पाच किलो कांदा खा.मनोज जरांगे यांची मंगळवारी ठाण्यातही सभा पार पडली. या सभेतही जरांगे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला होता. जरांगे पाटील म्हणाले, म्हातारपणात त्याला काहीच सुचेना झालंय. आपण त्याचं नाव घेत नाही. आपण कोणाचं नाव घेतलंही नाही आणि घेणारही नाही. कारण त्यांची तेवढी लायकी राहिलेली नाही. मुंबईत तो काय करतो ते माहितीय. त्याच्याकडे कोणते पाहुणे राहायला आले होते. त्याने कोणत्या पिक्चरमध्ये काम केलंय. मला त्याच्याबद्दल सगळं माहितीय.
मराठ्यांच्या जीवावर सत्ता भोगली
तुम्हाला ओबीसी बांधवांची आणि महात्मा फुलेंची एवढी आस्था आहे. तर, मग तुमच्या एकही कॉलेजला सावित्रीबाई फुले यांचे नाव का दिलं नाही. तुम्ही, लोकांना काय तत्त्वज्ञान शिकवणार, माझ्यासारख्या सामान्य घरातील लेकरावर नाही ते आरोप करतायत. 30 ते 35 वर्ष मराठ्यांच्या जीवावर सत्ता भोगली. मराठ्यांच्या उपकाराची परतफेड तुम्ही अशा प्रकारे करत आहात का?, तुम्ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही एकटेच 50 ते 55 टक्के मराठे आहोत. फक्त आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत आहोत, आमच्या वाट्याला जाऊ नका. यांच्यावर वेळीच बंधन घाला अशी सरकारला विनंती आहे, असेही जरांगे म्हणाले.